रायगडच्या विकासासाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By admin | Published: June 6, 2016 04:13 PM2016-06-06T16:13:16+5:302016-06-06T16:13:16+5:30

रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास आपण याच ठिकाणी मंजुरी देत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

500 crores sanction for development of Raigad | रायगडच्या विकासासाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

रायगडच्या विकासासाठी ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी

Next

- जयंत धुळप

रायगड दि. 6 - रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी तयार केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास आपण याच ठिकाणी मंजुरी देत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा सोमवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना संबोधित केले आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबध्द असून कुठलीच कमतरता पडू दिली जाणार नाही याची टाळ्यांच्या गजरात ग्वाही दिली.
कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली उगले तसेच रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहणारे पहिले मुख्यमंत्री
गेली अनेक वर्षे रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. यंदा शिवराज्याभिषेक दिनाचे ३४३ वे वर्ष आहे. तारखेनुसार साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दरवर्षी मुख्यमंत्र्यांना दिले जायचे. परंतु हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी हे निमंत्रण केवळ स्वीकारलेच नाही तर हवामान काहीसे खराब असूनही या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आग्रह धरला याबद्धल युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी त्यांच्या भाषणात प्रशंसा केली तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकाच गजर केला.
राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहता आले आणि ते सुध्दा युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबतीने शिवरायांवर अभिषेक करण्याची संधी मिळणे भाग्याचे आहे आणि आपण निश्चितच काहीतरी पूर्वपुण्याई केली आहे याचा मुख्यमंत्र्यांनी भावविवश होऊन उल्लेख केला. ते म्हणाले की, भारतातील इतर राजे जेव्हा मोगल बादशाहांचे मांडलिकत्व स्वीकारत होते तेव्हा केवळ १४ वर्षांच्या शिवाजीने आपले सैन्य जमवून स्वाभिमान काय असतो ते दाखविले. छत्रपतीनीच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य दिले.

गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी तिजोरी खुली
छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन तयार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी आमची तिजोरी खुली आहे असेही त्यांनी जाहीर केले. आमच्याकडील किल्ले ब दर्जा प्राप्त आहेत त्यामुळे पुरेशी आर्थिक मदत देश विदेशातून मिळत नाही. रायगडासारखा महत्वाचा किल्ला देखील उपेक्षित राहिला आहे त्यामुळे अशा सर्व महत्वाच्या किल्ल्यांना अ दर्जा कसा मिळेल हे पाहण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नात कुठेही कमी पडणार अन्ही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपली केंद्रीय पुरातत्व विभागाशी चर्चा झाली आहे. राज्य पुरातत्व विभागाशी सामंजस्य करार करून त्याद्वारे किल्ल्यांचे गतीने संवर्धन करावे, अशी विनंती आपण केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणले.

जागतिक वारसा यादीत किल्ल्यांचा समावेश करणार
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत जगातील महत्वाची स्थळे आहेत मात्र महाराष्ट्रातील विशेषत: शिवरायांचे गड किल्ले कुठेच दिसत नाहीत ही आपल्यासाठी योग्य बाब नव्हे. काही दिवसांपूर्वीच संभाजी राजे आपणाशी यासंदर्भात बोलले असून राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करून या किल्ल्यांना जागतिक महत्व प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही.
मराठा आरक्षण या मुद्द्यावर आमच्या शासनाची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून विधीमंडळात देखील आम्ही यासंदर्भात प्रस्ताव संमत केला आहे मात्र आता न्यायालयात भक्कमपणे संशोधन करून बाजू मांडण्यात येईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी यावर्षी ४ थीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन आणि युध्द कौशल्यावर विस्तृत धडा असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी देखील आपल्या भाषणात राज्य शासनाने गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अधिक प्राधान्य द्यावे आणि निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.

राजधानी रायगड कॉफी टेबल बुकचे अनावरण
आज या निमित्ताने " राजधानी रायगड " या माहिती व जनसंपर्कच्या कोकण विभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुठल्याही किल्ल्याची इत्यंभूत सचित्र माहिती आणि अप्रतिम छायाचित्रे असलेले शासनाने काढलेले हे पहिलेच कॉफी टेबल बुक आहे. या पुस्तकावरील मुखपृष्ठावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले रायगडचे हवाई छायाचित्र आहे. १०० पानी या पुस्तकात रायगड किल्ल्याच्या रचनेविषयी आणि स्थापत्य, किल्ल्यावरील वास्तू, भौगोलिक रचना यासंदर्भात उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून मांडणी आणि सजावट पुण्याचे विलास काणे याची आहे तर ऐतिहासिक व इतर माहिती कोकण इतिहास परिषदेचे सचिव सदाशिव टेटविलकर, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक डॉ दिलीप बलसेकर यांनी संकलित केली आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने देखील यातील काही माहिती आणि संदर्भ दिले आहेत.

भारलेले वातावरण आणि जयघोष
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक युवराज छ.संभाजीराजे यांच्या मागदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते आज पहाटे रायगडावरील नगारखाण्यासमोर भगवा ध्वज उभारून राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर युवराज संभाजी राजे यांनी मिरवत पालखी सभास्थळी आणली. मुख्यमंत्री देखील त्यांचासमवेत होते. मंत्रोच्चाराच्या निनादात शिवरायांच्या मूर्तीवर या दोघांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर त्यांनी सुवर्ण नाण्याचा अभिषेक केला. यावेळी मुख्यमंत्री आणि संभाजी राजे यांनी शिवप्रेमींच्या आवाजात आवाज मिसळून शिवरायांच्या जयजयकराच्या घोषणा दिल्या. तत्पूर्वी होळीच्या मालावर हलगी घुमक व कैताळाच्या कडकडात शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षीके सादर केली गेली. महिला व पुरुषांची ढोल ताशा पथके देखील यात सहभागी झाली होती. हजारो तरुण काल सायंकाळपासूनच रायगडावर चढाई करीत होते. तर शेकडो वाहने महाड ते रायगड रस्त्यावर दिसत होती.

काय आहे रायगडाच्या विकासाचा आराखडा
याप्रसंगी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात रायगडचा विकास नेमका कसा असेल याची कल्पना मान्यवरांना दिली.भारतीय पुरातत्व विभागामार्फत सुमारे ८४ लाखाची कामे, रायगड किल्ला, पाचाड येथील समाधी आणि वाडा परिसरात घ्यावयाची ४५ लाखाची कामे, रायगड परिसरातील पर्यटन सात किमी परिसरातील २१ गावे आणि वाड्यामधून पायाभूत सुविधांची कामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय भुताल परिवहन मंत्रालयाची कामे, भू संपादन, रज्जूमार्ग असा सुमारे ५०० कोटींचा आराखडा आहे . पुणे जिल्हाधिकारी असतांना प्रभाकर देशमुख यांनी शिवनेरीच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केले होते. आता विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविताना त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेषत: रायगड विकासाचे सनियंत्रण सोपविले आहे.

Web Title: 500 crores sanction for development of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.