महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 03:15 AM2018-09-20T03:15:31+5:302018-09-20T03:16:10+5:30
पुणे, मुंबई, नागपूरसह दहा केंद्रांचा समावेश
मुंबई : भविष्यात विद्युत वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता, राज्यातील विविध ठिकाणी ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मंजुरी मिळाली असून, ही केंद्र महावितरणकडून उभारली जातील.
महावितरणतर्फे पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. यामध्ये मुंबई ४, ठाणे ६, नवी मुंबई ४, पनवेल ४, पुणे १०, मुंबई- पुणे महामार्ग १२, नागपूर १० केंद्रांचा समावेश आहे. यासाठीच्या निविदा अंतिम टप्प्यात असून, एका आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत. नागपूर येथील अमरावती रोड उपकेंद्र आणि पुणे येथील पॅराडीगम उपकेंद्रात प्रत्येकी एक फास्ट डीसी चार्जिंग केंद्र उभारण्यात आले असून, ते लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.
रात्रीच्या वेळी दरात सवलत
एका विद्युत वाहन चार्जिंग केंद्रासाठी महावितरणला २ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्युत वाहन चार्जिंग केंद्र महावितरणच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध अतिरिक्त जागेत उभारण्यात येतील. ही केंद्र फास्ट डीसी चार्जिंग केंद्र असतील. एक वाहन पूर्ण चार्ज करण्यासाठी अंदाजे ४५ मिनिटे ते एक तास एवढा कालावधी लागेल. विद्युत वाहनचालकांना प्रतियुनिट ६ रुपये दर टीओडी तत्त्वावर चार्जिंगसाठी आकारण्यात येईल. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत वीजदरात १ रुपया ५० पैसे सवलत देण्यात येईल.