५०० किलो निर्माल्य जमा
By admin | Published: September 18, 2016 12:52 AM2016-09-18T00:52:10+5:302016-09-18T00:52:10+5:30
भीमा नदीच्या विसर्जन घाटावर गणपती विसर्जनाचे सुमारे ५०० किलो निर्माल्य जमा करून कंपोस्ट खतनिर्मितीसाठी शाळेला दिले.
तळेगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी येथील विद्यार्थी व युवकांनी पुढाकार घेऊन भीमा नदीच्या विसर्जन घाटावर गणपती विसर्जनाचे सुमारे ५०० किलो निर्माल्य जमा करून कंपोस्ट खतनिर्मितीसाठी शाळेला दिले.
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्रीपांडुरंग विद्यामंदिर, मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या निर्माल्य संकलन उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, हा उपक्रम शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष पी. बी. जगताप व प्रा. संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश राऊत, घनश्याम गवारे, श्याम गवारे व श्रीपांडुरंग विद्यामंदिराचे विद्यार्थी यांनी यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी दिवसभरात सुमारे ५०० किलो निर्माल्य गणेशभक्तांकडून विसर्जनाच्या दरम्यान जमा केले. भीमा नदीच्या घाटाचा परिसर स्वच्छ केला. यावर्षीच्या निर्माल्य संकलनास गणेशभक्तांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वत:हून निर्माल्य जमा केले. या निर्माल्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर न कुजणारे प्लॅस्टिक, थर्माकोल यांसारखे पदार्थ विद्यार्थ्यांनी निर्माल्यातून स्वतंत्र केले व याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. भीमा नदीच्या पाण्यात या उपक्रमामुळे फक्त श्रीगणेश मूर्तींचेच विसर्जन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषणास आळा बसला. विशेषत: सर्व गणेश मंडळे व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यास आलेल्या गणेशभक्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी उपसरपंच दिलीप गवारे, अॅड. संतोष गवारे उपस्थित होते. (वार्ताहर)
>गेल्या तीन वर्षांपासून गणेश विसर्जनादरम्यान जमा होणाऱ्या निर्माल्याचे श्रीपांडुरंग विद्यामंदिरमधील विद्यार्थी कंपोस्ट खत तयार करतात, याचा उपयोग शालेय आवारातील व विठ्ठलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील झाडांना हे कंपोस्ट खत टाकले जाते. या वर्षीही गतवर्षाच्या तुलनेत दुपटीने निर्माल्य जमा करून कंपोस्ट खताच्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे भीमा नदीचे पाणी स्वच्छ राहण्यास चांगलीच मदत झाली.
- पी. बी. जगताप, अध्यक्ष, शिरूर तालुका कला-शिक्षक संघ
>पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम स्तुत्य असून, गाव स्वच्छ करण्यास स्वत:हून विद्यार्थी व युवकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. निर्माल्य संकलनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५ फुटी कलश देण्यात आला होता. पुढील वर्षी गणेश विसर्जनही हौदामध्ये करण्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेईल.
- दिलीप गवारे, उपसरपंच, ग्रामपंचायत विठ्ठलवाडी