500 रुपयांची नोट घेण्यास नकार; ग्राहकाने रस्त्यावर फेकली बिर्याणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 08:36 PM2016-11-09T20:36:22+5:302016-11-09T22:07:02+5:30
उमरी येथे एका हॉटेल मालकाने 500 रुपयांची नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व हॉटेल मालक यांच्यात मारामारी झाली़, यावेळी एका ग्राहकाने थेट हॉटेलमधील बिर्याणीचे
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 09 - उमरी येथे एका हॉटेल मालकाने 500 रुपयांची नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व हॉटेल मालक यांच्यात मारामारी झाली़, यावेळी एका ग्राहकाने थेट हॉटेलमधील बिर्याणीचे पातेलेच रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली.
बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास काही ग्राहक एका हॉटेलात आले होते. खाद्यपदार्थ घेतल्यानंतर संबंधितांनी 500 रुपयाची नोट दिली. त्यावेळी हॉटेल चालकाने चिल्लर नाहीत, असे सांगून नोट घेण्यास नकार दिला. यामुळे ग्राहक आणि हॉटेल मालक यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. हॉटेलमधील कामगार व इतरांना मारहाण करण्यात आली़. ग्राहकाने बिर्याणीचे पातेले रस्त्यावर फेकले. परिणामी वातावरण चिघळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फारूख खान तत्काळ घटनास्थळी आले. पोलिसांना पाहताच ग्राहक पळून गेले. हॉटेल मालक व नोकरांची समजूत घालून सहाय्यक पोलिस निरीक्षक खान यांनी वातावरण शांत केले. तरीही दोन्ही बाजूने जमाव एकत्र येवू लागला. यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवार यांच्यासह पोलिस फौजफाटा पोहोचला. काही वेळेत अप्पर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, उपअधीक्षक विशाल खांबे, भोकरचे पोलिस निरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक शहदेव खेडकर, ज्ञानेश्वर शिंदे आदींनी जमावाला पांगविले.
उमरीसह भोकर, कुंडलवाडी, धर्माबाद ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाखल झाले. नांदेडहून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी वातावरण निवळले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.