७00 रूपयांच्या अनुदानासाठी ५00 रूपये खर्च
By admin | Published: August 7, 2014 09:33 PM2014-08-07T21:33:02+5:302014-08-07T21:33:02+5:30
बँक खाते उघडणे अनिवार्य : जननी सुरक्षा योजनेचा लाभ ठरतोय डोकेदुखी
खामगाव: दारिद्रय़रेषेखालील महिलांना प्रसूतीपश्चात स्वत:ची काळजी घेता यावी, याकरिता जननी सुरक्षा योजनेतून ७00 रूपये अनुदान दिले जाते; मात्र हा लाभ लाभार्थी महिलेच्या बँक खात्यातच जमा केला जात असल्याने, बँकेत खाते उघडण्यासाठी लाभार्थी महिलांना ५00 रुपयांचा खर्च सोसावा लागत आहेत.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत १२ एप्रिल २00५ पासून राज्यात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. माता व नवजात अर्भकाचा मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. दारिद्रयरेषेखालील तसेच अनुसुचित जाती व जमातीमधील मातांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो.
लाभार्थी महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत ७00 रूपयांचे एकरकमी अनुदान धनादेशाव्दारे दिले जाते. शहरी क्षेत्रामध्ये हे अनुदान ६00 रूपये, तर प्रसुती घरी झाल्यास फक्त दारिद्रयरेषेखालील लाभार्थींनाच ५00 रूपये अनुदान दिले जाते.
प्रसुतीनंतर मातेला सकस आहार मिळावा तसेच नवजात बाळाचे कुपोषण होऊ नये, या उद्देशाने आरोग्य विभागाच्यावतीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रसुतीनंतर लाभार्थी मातेला देण्यात येणारा लाभ हा धनादेशाच्या स्वरूपात असतो. २0१३ च्या पूर्वी हे धनादेश बेअरर स्वरूपात देण्यात येत होते. त्यामुळे ते वठविण्यासाठी लाभार्थीचे बँकेत खाते असणे आवश्यक नव्हते; मात्र आता हे धनादेश लाभार्थींच्या खात्यात जमा केले जात असल्याने, लाभार्थींना बँकेत खाते उघडण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. बँकेत खाते उघडण्यासाठी ५00 रूपये खर्च येतो. एवढय़ा कमी रकमेच्या अनुदानासाठी ५00 रूपयांचा खर्च सोसणे लाभार्थींना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ही योजना लाभार्थींसाठी डोकेदुखी ठरत आहे.
** गैरव्यवहारास आळा घालणे शक्य
लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाचा धनादेश जमा करण्याची प्रक्रिया पारदश्री आहे. या पद्धतीमुळे गैरव्यवहारास आळा घालणे शक्य आहे. त्यामुळे अनुदान देण्याची हीच पद्धत शासनाने सुरू ठेवली तर ती हिताचीच आहे; मात्र त्यासाठी बँकेत झीरो बॅलेन्सवर खाते उघडण्याची तरतूद करण्याची गरज असल्याचे मत लाभार्थींमधून व्यक्त होत आहे.