विनाहेल्मेट आढळल्यास ५00 रुपये दंड

By admin | Published: August 12, 2016 02:50 AM2016-08-12T02:50:42+5:302016-08-12T02:50:42+5:30

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा निर्णय शासनाकडून मागे घेण्यात आल्यानंतर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी अनेक पर्याय आता शोधले जात आहेत

500 rupees fine if found in Vinylmate | विनाहेल्मेट आढळल्यास ५00 रुपये दंड

विनाहेल्मेट आढळल्यास ५00 रुपये दंड

Next

मुंंबई : ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा निर्णय शासनाकडून मागे घेण्यात आल्यानंतर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी अनेक पर्याय आता शोधले जात आहेत. यात पेट्रोलपंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याचे दिसताच त्यांना नव्या वाढीव दंडाला सामोरे जावे लागेल. १५ आॅगस्टनंतर पेट्रोलपंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करतानाच वाढीव ५00 रुपये दंड आकारण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
हेल्मेट सक्तीबाबत दुचाकीस्वारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने परिवहन विभागाकडून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चा नियम काढण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून करण्याचा निर्णय घेतला. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्याला पेट्रोल न देण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या चालकाने हेल्मेट परिधान केले नसेल तर त्यावर कारवाई करतानाच त्याला सहकार्य करणाऱ्या पेट्रोलपंप चालकांवरही कारवाई करण्यात येणार होती. या कारवाईसाठी प्रत्येक पेट्रोलपंपावर एक वाहतूक पोलीस तैनात केला जाणार होता. मात्र त्याचा धसका घेत पेट्रोल-डीलर्स असोसिएशनने आता असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार विरोध केला. या विरोधामुळे अधिवेशनादरम्यान शासनाकडून हा नियम मागे घेण्यात आला.
त्यानंतर पेट्रोलपंपावर आलेल्या दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान न केल्यास त्याच्या वाहनाचा नंबर पंपचालकाने घ्यावा आणि त्याची माहिती त्वरित वाहतूक पोलिसांना देण्याचा आणखी एक नियम काढण्यात आला. परंतु त्यालाही पेट्रोलपंप चालकांकडून विरोध केला गेला. अखेर यावर तोडगा म्हणून हेल्मेट सक्तीसाठी नवा नियम काढण्यात आला. पेट्रोलपंपावर दुचाकीस्वार आल्यास त्याने हेल्मेट परिधान केले नसेल तर त्याला नव्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. दुचाकीस्वाराला पेट्रोल भरण्यास दिले जाईल. मात्र हेल्मेट नसल्याने त्याला वाढीव दंड आकाला जाणार आहे. हा दंड ५00 रुपये असेल आणि त्याची अंमलबजावणी १५ आॅगस्टनंतर केली जाईल. सध्या मुंबईतील पेट्रोलपंपांवर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती केली जात आहे. तसेच नव्या दंडाच्या रकमेची माहितीही दिली जात आहे. सध्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्यास १00 रुपये दंडच संपूर्ण मुंबईत आकारला जात आहे. १५ आॅगस्टनंतर प्रथमच या नव्या दंडाची अंमलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

नो हेल्मेट, नो पेट्रोल नियमाला आम्ही विरोध केला. हा निर्णय मागे घेतल्यानंतर पेट्रोलपंपावर येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या वाहनांचे नंबर घेण्याची सूचना केली. मात्र तीही सूचना आम्ही मान्य केली नाही. ते काम आमचे नसून वाहतूक पोलिसांचे आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस दुचाकीस्वारांच्या वाहनांचे नंबर घेऊन कारवाई करतील.
- रवी शिंदे , पेट्रोल-डीलर्स असोसिएशन, मुंबई अध्यक्ष

Web Title: 500 rupees fine if found in Vinylmate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.