पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 21:07 IST2025-04-24T21:06:31+5:302025-04-24T21:07:26+5:30
Maharashtra Government rescue operation, Pahalgam Terror Attack: राज्य सरकारने दोन विशेष विमानांनी पर्यटकांना आणले महाराष्ट्रात, उद्या आणखी २३२ प्रवाशांसाठी आणखी एक विशेष विमान

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
Maharashtra Government rescue operation, Pahalgam Terror Attack: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या २ दिवसांत आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती. त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील, तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. गिरीश महाजन हे लष्करी रुग्णालयात महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या पर्यटकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी… pic.twitter.com/3iPbTLZLg9
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2025
काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येणार्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम, जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे १४ पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे.
उद्या काश्मिरातून येणार्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.