विवाहबाह्य संबंधामुळे ५०० संसार उघड्यावर; पती-पत्नीच्या मित्र मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 06:26 PM2018-03-06T18:26:38+5:302018-03-06T18:26:38+5:30
खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे.
- गजानन राऊत
खामगाव : खामगाव विभागात मागील चार वर्षात सर्वाधिक प्रकरणात विवाहबाह्य संबंध असल्याच्या तक्रारी दाखल झाल्याने ५०० हून अधिक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यामध्ये पती-पत्नीच्या मित्र-मैत्रीणीचा वाढता हस्तक्षेप आणि पती-पत्नीमधील असलेला कमी संवाद ही मुख्यत्वे कारणे असल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल नुकताच आलेला आहे.
८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्त या विषयाचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या युगामध्ये महिला आणि पुरूष समान आहेत. काही ठिकाणी महिला पुरूषांपेक्षा जास्त मेहनत करणा-या दिसतात. नोकरी करून घरकाम करणे आणि नव-याचे पण ऐकणे हे सर्व करत असताना खुप मोठी कसरत महिलांना करावी लागते. परंतु सध्याच्या व्हॉटसअप आणि फेसबुकच्या जमान्यात मात्र पती-पत्नीचा संवादच कमी असल्याने एकमेकांविषयी असलेला गैरसमज वाढत जातो आणि त्याचे रूपांतर विभाजनात होताना दिसत आहे.
एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विभागात ५०० प्रकरणे विवाहबाह्य संबंधाची म्हणजेच अनैतिक संबंधाची दाखल झाले असल्याने आणि हे करत असताना शिक्षा पात्र गुन्हा नसल्यामुळे कायद्याविषयी कुठलीही भिती लोकांमध्ये राहिलेली दिसत नाही.
बदलती जीवनशैली...
सोशलमिडीयाच्या अतिरेकी वापरामुळे नातेसंबंधात दूरी निर्माण होत आहे. एकमेकांच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. आणि एकमेकांकडून अपेक्षाही वाढत आहेत. यामध्येच अहंकार वाढत असल्याने पती-पत्नी दोघेही उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने कोणी कोणाचे ऐकायचे आणि कोणी कोणाला समजून घ्यायचे ह्यासाठीच चढाओढ लागलेली असते. समोरच्याने बदल करावे मी बदल करणार नाही अशा अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास येते.
अपत्य प्राप्तीनंतर पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. कोणीच कोणाला समजून घ्यायला तयार नाही. दोघा पती-पत्नीमध्ये दोघांच्याही मित्र-मैत्रीणींचा वाढता हस्तक्षेप असल्याने विभाजन करण्याला हे कारण सुद्धा पुरेसे ठरत आहे. कायद्याबद्दल भिती नसल्यामुळे पहिली पत्नी असतानाही सर्रासपणे दुसरे लग्न करताना पुरूष मंडळी सहज दिसत आहेत.
अनैतिक संबंधामुळे दोघा पती-पत्नीमध्ये होणारे सततचे वादविवाद सुद्धा विकोपाला जाताना दिसतात. टिव्ही, मोबाईल, व्हॉटसअप, फेसबुक यांच्या सततच्या वापरामुळे पती-पत्नी यांच्यामधील संवाद खुपच कमी झाला आहे. पती-पत्नीचा केवळ मोबाईल वरच व्यवहारीक संवाद होत असल्याने त्यांच्यामध्ये वादविवाद होतात.
बदलती मानसिकता...
दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा, स्वभाव जर जुडत नसतील तर विभक्त व्हा अशी संकल्पना समाजामध्ये रूजत असल्याने अनेक सुशिक्षित जोडप्यांचे विचार असल्याचे निष्पन्न होत आहे.
मागील चार वर्षात ४९२ प्रकरण दाखल झाले. त्यापैकी ४५८ प्रकरणे अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध असल्याचे होते. यापैकी २३८ प्रकरणांचा निपटारा झाला. आणि उर्वरीत जोडप्यांना काऊंन्सिलींग करणे सुरू आहे.
- स्वाती इंगळे, प्रिती मगर
समुपदेशक, महिला तक्रार निवारण केंद्र, पोलीस स्टेशन खामगाव