राज्यात स्वाइन फ्लूचे ५२ बळी; आणखी १३ जण व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:32 AM2019-03-11T06:32:24+5:302019-03-11T06:32:53+5:30
उन्हाचा चढता पारा आणि बदलते वातावरण, यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे.
मुंबई : उन्हाचा चढता पारा आणि बदलते वातावरण, यामुळे राज्यातील स्वाइन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. १ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत राज्यात स्वाइन फ्लूमुळे राज्यभरात ५२ बळी गेले आहेत, तर १३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या रुग्णालयात २४९ रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यात नाशिकमध्ये सर्वाधिक १५ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे, तर राज्यात सध्या ६७५ स्वाइन फ्लूचे रुग्ण असल्याचे आढळले आहे.
राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २८ हजार ४१४ रुग्णांना तपासण्यात आले, त्यापैकी ७ हजार १३३ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या दिल्या. पुणे येथील ११ तर नागपूर येथील दोन रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत गतवर्षी महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने ४ जणांचा बळी घेतला होता आणि १५ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा उद्रेक किती भयंकर आहे, याची कल्पना या आकड्यांवरून येते.
स्वाइन फ्लूविषयक प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यभरात नियमित सर्वेक्षण, फ्लू सदृश्य रुग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार, खासगी रुग्णालयांना स्वाइन फ्लू उपचारांची मान्यता, गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून तरतूद, मोफत निदान सुविधा, महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना अशा विविध उपाययोजना सुरू आहेत.
स्वाइन फ्लूशी दोन हात करण्यासाठी एच-१, एन-१ ची प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध असली, तरी २००९ पासून साऱ्या जगावर हल्ला चढविणाऱ्या स्वाइन फ्लूची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांत एकट्या देशात या संसर्गाने हजारो बळी घेतले आहेत. जगभरातील स्वाइन फ्लूच्या बळींचा आजवरचा आकडा लाखांहून अधिक आहे.
जिल्हा/मनपा मृत्यू
नाशिक १५
नागपूर ९
पुणे मनपा ६
अमरावती, मुंबई, पुणे ग्रामीण प्रत्येकी ३
कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, अहमदनगर, भंडारा, जळगाव
सोलापूर, वसई-विरार, पालघर प्रत्येकी १
एकूण ५२
ही आहेत स्वाइन फ्लूची लक्षणे
स्वाइनच्या संशयित रुग्णांमध्ये तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शरीरातील पाणी कमी होणे आदी लक्षणे आढळून येतात.