५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 06:16 AM2019-04-07T06:16:25+5:302019-04-07T06:16:29+5:30

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या.

52 live matches; Both in the ring; Where the thorns, where one-sided | ५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

googlenewsNext

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या. कुठे काट्याची लढत झाली, तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले. महाराष्ट्रातील अशी शेवटची थेट लढत १९९८ साली साताऱ्यात झाली. त्यावेळी काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा १ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर, गेल्या ४ निवडणुकांमध्ये राज्यात अशी एकही थेट लढत झाली नाही. १९९८च्या पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये (१९८९, १९९१ व १९९६) राज्यात सर्व मतदारसंघात तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत (१९५१) राज्यात तब्बल १७ ठिकाणी तर १९७७ साली १६ ठिकाणी दोनच उमेदवार रिंगणात होते.


१९८४ मध्ये फक्त सांगलीत दोन उमेंदवार होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील (काँग्रेस) यांनी जनता पार्टीचे विश्वासराव पाटील यांना पराभूत केले होते. १९८० मध्येही फक्त सांगलीतच अशी लढत झाली. त्यावेळी खुद्द वसंतदादा पाटील (काँग्रेस) यांनी विश्वासराव पाटील (जनता पार्टी) यांचा १ लाख ६७ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून २००९ पर्यंत सांगलीकरांनी लोकसभा निवडणुकीत वसंतदादा घराण्यालाच कौल दिला होता. पण गेल्यावेळी मात्र त्यांचे नातू प्रतिक पाटील यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला. यंदा येथे पाटील घराण्यातील उमेदवार विशाल पाटील (स्वाभिमानी) रिंगणात आहे, पण काँग्रेसचा उमेदवार मात्र नाही.


१९७७ साली तब्बल १६ ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. यात सांगली, राजापूर, रत्नागिरी, कुलाबा, डहाणू, नंदूरबार, एरंडोल, नांदेड, जालना, बीड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, खेड व बारामती या मतदारसंघांचा समावेश होता. नंदुरबार, सोलापूर, पंढरपूर, खेड, सांगली व इचलकरंजी या ६ ठिकाणी त्यावेळी काँग्रेसने बाजी मारली. इतर सर्व १० ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी लातुरात काट्याची लढत होऊन शेकापचे उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसचे पंढरीनाथ पाटील यांचा अवघ्या ७ हजार ८५१ मतांनी पराभव केला होता.


१९७१ मध्ये फक्त सोलापुरात दोन उमेदवार होते. त्यात काँग्रेसचे सूरजरतन दमानी यांनी पत्रकार रंगाअण्णा वैद्य (अपक्ष) यांचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. १९६७ च्या निवडणुकीत पंढरपूर, मालेगाव व नंदुरबार हे तीन राखीव मतदारसंघ आणि नाशिक अशा चार ठिकाणी दोनच उमेदवार होते. यापैकी पंढरपुरात (एससी राखीव) काँग्रेसचे टीएच सोनवणे फक्त १,०७९ मतांनी विजयी झाले होते. मालेगाव (एसटी) मध्ये काँग्रेसचे झामरू कहांडोळे यांनी फक्त ९,२०२ मतांनी बाजी मारली होती. इतर दोन मतदारसंघातील मताधिक्य ३६ हजारांहून जास्त होते.


१९६२ मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते. १९५१ म्हणजे पहिल्या निवडणुकीत तब्बल १७ ठिकाणी प्रत्येकी दोनच उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, मुंबई शहर
उत्तर, चंद्रपूर, धुळे, पूर्व खांदेश, पश्चिम खांदेश, पुणे, रत्नागिरी,
कराड, कोपरगाव, कुलाबा, मालेगाव व मिरज या १७ ठिकाणी दोनच उमेदवार होते.

१९६२मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते.

Web Title: 52 live matches; Both in the ring; Where the thorns, where one-sided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.