Mucormycosis: चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचं थैमान, ५२ जणांचा मृत्यू; अनेकांनी डोळे गमावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 06:36 AM2021-05-15T06:36:01+5:302021-05-15T06:40:55+5:30
या दुर्मीळ आजारामुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत.
मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याची उदाहरणे राज्यभरात दिसून आली आहेत. या दुर्मीळ आजारामुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. राज्यभरात या आजाराची काय स्थिती आहे, याचा आढावा ‘लोकमत’च्या चमूने घेतला. त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट.
प. महाराष्ट्र/कोकण
पुण्यात १३ जणांचा मृत्यू एक हजारावर रुग्ण -
पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातनाकात इजा झालेले तीन, डोळ्याला आजार झालेले दोन रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टरांकडे उपचार घेणारे ४० रुग्ण आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही.
मुंबई -
१२ जणांचा एक डोळा काढला -
केईएम, नायर, सायन या पालिका रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांचे निदान वाढले आहे. २ ते ३ रुग्ण आढळल्याचे अधिष्ठाता
डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र -
शेकडो जणांना लागण -
नाशिक शहर व जिल्ह्यात मिळून ५ जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात सध्या मात्र नवीन कोणीही रुग्ण दाखल झालेले नाहीत. जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० पेक्षा अधिक रुग्णांवर विविधप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टाळूला छिद्रे पडल्याचे प्रकारही या आजारात जळगावात निदर्शनास आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये १८ रुग्ण आढळले.
दररोज नवे रुग्ण -
नागपूरमध्ये आठवड्याला २० ते २५ रुग्णांची नोंद होत आहे. मागील तीन महिन्यांत खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून ३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात चार महिन्यांत ४९ रुग्णांची नोंद झाली. अमरावतीत सध्या पाच रुग्ण दाखल असून आठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. श्रीकांत महल्ले यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सात रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या.
मराठवाडा -
१३ जणांना अंधत्व -
औरंगाबादेत म्युकरमायकोसिसमुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जणांचे डोळे काढले, तर ९६ जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे ४५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात १२० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावात १५ दिवसांत म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण आढळले आहेत.