५३ लाखांच्या जुन्या नोटा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 04:13 PM2017-03-30T16:13:30+5:302017-03-30T16:13:30+5:30
सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - सक्करदरा पोलिसांनी एका कारमधील तिघांना जेरबंद करून त्यांच्याकडून ५३ लाख, ४४ हजारांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. ताजबाग परिसरातून एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड नेली जाणार असल्याची माहिती सक्करदरा पोलिसांना बुधवारी रात्री मिळाली. त्यावरून पोलिसांनी ताजबाग परिसरात नाकेबंदी केली. रात्री ९च्या सुमारास त्यांना पांढ-या रंगाची हुंडाई कार (एमएच ३१/ सीएन ९०२७) येताना दिसली. मात्र, समोर पोलीस दिसताच कारचालकाने वळण घेऊन वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तयारीत असलेल्या पोलिसांनी चारही दिशेने घेराबंदी करून कारचालकाला तुकडोजी मार्गावरील वैरागडे हॉस्पिटलजवळ रोखले.
कारमध्ये श्रवणकुमार सुब्रमण्यम (वय ४७, रा. हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, नागपूर), मनोज भाऊराव पारवे (वय ४१, हरिजन कॉलनी, बेझनबाग) आणि विठ्ठल वसंंतराव चालवंत (वय ३९, रा. नवीन फुटाळा अंबाझरी ) बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता त्यात चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा आढळल्या. वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून असलेल्या या नोटा कुठून आणल्या, कुठे नेणार होते, त्याबाबत हे तिघेही समाधानकारक उत्तरे देत नव्हते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांनी सक्करदरा ठाण्यात भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली.
प्रकरण प्राप्तिकर खात्याकडे
पोलिसांनी मशिन मागवून मध्यरात्रीपर्यंत नोटा मोजल्या तेव्हा ही रोकड ५३ लाख, ४४ हजार, ५०० रुपयांची भरली. या नोटा कुठून आणल्या ते पहाटेपर्यंत स्पष्ट झाले नाही. संबंधित तिघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून पोलिसांनी गुरुवारी सकाळी हे प्रकरण प्राप्तिकर खात्याकडे सोपविले. परिमंडळ चारचे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रवींद्र कापगते, ठाणेदार आनंद नेर्लेकर आणि त्यांच्या सहका-यांनी ही कामगिरी बजावली.