राज्यातल्या ५४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:00 PM2020-01-25T18:00:07+5:302020-01-25T18:10:38+5:30
महाराष्ट्रातल्या ५४ पोलीस पोलिसांचा गौरव होणार
मुंबई: राज्यातल्या ५४ पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं या पोलिसांची यादी जाहीर केली आहे. देशातल्या १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ५४ जणांचा समावेश आहे. यापैकी १० पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झालं आहे.
अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा. पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक) या चार अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे या पोलिसांचा शौर्य पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातल्या ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदकानं गौरवण्यात येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयानं राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदकांची घोषणा केली. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या शौर्य पदक, विशिष्ट सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातल्या १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यापैकी ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं गौरवलं जाईल. तर २८६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदकानं सन्मानित केलं जाईल.