मर्कटलीलांनी ५,४४३ जण घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:16 AM2024-02-01T11:16:07+5:302024-02-01T11:16:28+5:30
Pune Crime News: राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत.
पुणे - राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत. याच कालावधीत राज्यात ६० हजार ५४३ जणांना मांजर चावल्याचीही नाेंद झाली आहे.
वन्यप्राणी किंवा पाळीव प्राण्यांनी माणसाला चावा घेतल्यास रेबिज हाेण्याची शक्यता असते. ताे हाेऊ नये म्हणून त्यावर आराेग्य यंत्रणेकडे प्रतिबंधात्मक लस घेतली जाते. सरकारी रुग्णालयांत लस घेताना आराेग्य यंत्रणेकडे नोंद केली जाते. अशा प्रकारे केलेल्या नोंदीतून ही आकडेवारी समोर आली आहे.
मांजरांचे सर्वाधिक चावे मुंबईत
मुंबईत मांजरांच्या सर्वाधिक १२,७३२ चाव्यांची नाेंद झाली. त्याखालाेखाल काेल्हापूर (९,०४५), ठाणे (६,४११), रायगड (३,०९८) आणि पाचव्या क्रमांकावर पालघर असून, तेथे २ हजार २२० जणांना माजरांनी चावे घेतले आहेत.
जालन्यात सर्वाधिक माकडांचे चावे
जालना जिल्ह्यापाठोपाठ (७१०) अमरावती (५७६), उस्मानाबाद (५०६), मुंबई (३८२) आणि सातारा जिल्ह्यात २६२ जणांना माकडांनी चावे घेतले आहेत. यवतमाळमध्ये सर्वांत कमी १२ चावे नाेंदवले गेले आहेत.