कॅनरा बँकेतून ५५ लाखांची चोरी
By admin | Published: August 27, 2014 04:45 AM2014-08-27T04:45:33+5:302014-08-27T04:45:33+5:30
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील कॅनरा बँकेतून तब्बल ५५ लाखांची रोकड चोरी झाली. चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात आला
मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील कॅनरा बँकेतून तब्बल ५५ लाखांची रोकड चोरी झाली. चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास बँक उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना लक्षात आला. या प्रकरणी घाटकोपर पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी सातच्या सुमारास व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी बँक बंद करून निघून गेले. मात्र आज सकाळी जेव्हा बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा दरवाजा उघडा आढळला. आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. विशेष म्हणजे बँकेचा स्ट्राँग रूमही उघडा आढळला. कर्मचाऱ्यांनी स्ट्राँगरूम पाहिला तेव्हा तेथे किरकोळ चिल्लर, सुटटया नोटा वगळता चोरटयांनी पाचशे व हजार रूपयांची बंडले गायब होती. मोजदात झाली तेव्हा चोरटयांनी ५५ लाख ४० हजारांची रोकड चोरल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा चोरटयांनी बँकेचा मुख्य दरवाजा, स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडताना तोडफोड केलेली आढळली नाही. तसेच अशा बनावट चाव्या बनविणेही कठिण असल्याने या चोरीत बँकेतल्याच कर्मचाऱ्याचा हात असावा, असा संशय पोलिसांना आहे. वरिष्ठ निरिक्षक राजाराम व्हनमाने यांच्या माहितीनुसार बँकेतल्या आणि बाहेरच्या अन्य सीसीटीव्हींचे चित्रण तपासणीसाठी ताब्यातघेतले आहे.