‘समृद्धी’ला लागले 55 लाख मे. टन सिमेंट! एवढ्यात काय काय बांधता आले असते...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:45 AM2022-12-11T07:45:28+5:302022-12-11T07:46:09+5:30
महाराष्ट्राच्या अर्थकारणात गेम चेंजर ठरू शकणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानिमित्ताने...
- विनय उपासनी, मुख्य उपसंपादक
खाद्या पायाभूत प्रकल्पाच्या उभारणीची घोषणा झाली की हा प्रकल्प हवाच का, काय गरज आहे त्याची इथपासून प्रस्तावित प्रकल्पाच्या फायद्या- तोट्याच्या गणितापर्यंतची चर्चा सर्व स्तरावर सुरू होते. सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होतो. विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारला प्रकल्पग्रस्तांसाठी विविध सवलतींची घोषणा करावी लागते. यथावकाश पायाभूत प्रकल्प मार्गी लागतो. त्यानंतर प्रकल्पाची व्याप्ती पाहून मग त्याची वाहवा सुरू होते. अगदी अशीच कथा आहे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाची.
गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या लांबीच्या भव्यदिव्य द्रुतगती महामार्गाची उभारणीच झाली नव्हती. त्यामुळे २०१५ मध्ये जेव्हा समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा झाली तेव्हापासून हा प्रकल्प चर्चेत राहिला. ७०१ किमी लांबीचा हा द्रुतगती मार्ग देशातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे.
दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडत जाणारा महाराष्ट्र शासनाचा समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेरीस मार्गी लागला आहे. या द्रुतगती महामार्गाच्या उभारणीसाठी विक्रमी असे बांधकाम साहित्य लागले.
महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
समृद्धी महामार्गामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. सर्वाधिक लांबीचे द्रुतगती महामार्ग असलेल्या राज्यांच्या पंक्तीत महाराष्ट्र आता दुसऱ्या क्रमांकावर असेल. याआधी महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता.
पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. उत्तर प्रदेशात १,३९६ किमी लांबीचे आठ द्रुतगती महामार्ग आहेत. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गामुळे आता ८१२ किमी लांबीचे दोन द्रुतगती महामार्ग असतील.
किती साहित्य लागले?
५५,४९,०६०
मेट्रिक टन सिमेंट
तुलनाच करायची झाल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणात सिमेंट आणि स्टील वापरल्यास शेकडो पाच ते सात मजली इमारती उभारल्या जाऊ शकतात.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी
३६,३२१
मजुरांनी घाम गाळला. त्यातील बहुतांशी कामगार परराज्यातील होते, हे विशेष.
७०१
किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम १६ टप्प्यांत विभागण्यात आले.
एकाच कंपनीकडे एवढ्या मोठ्या महामार्गाच्या उभारणीचे कंत्राट देणे इष्ट ठरले नसते म्हणून हा निर्णय घेण्यात आला.