'लोकमंगल'तर्फे उद्या ५५ जोडप्यांचा विवाह
By Admin | Published: January 17, 2017 05:54 AM2017-01-17T05:54:06+5:302017-01-17T05:54:06+5:30
लोकमंगल फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, १८ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार
मुंबई : लोकमंगल फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, १८ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार असून, त्यात ५५ सर्वधर्मीय जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली.
विवाहावेळी येणाऱ्या अडचणी, पैशाची उधळण, जाचक हुंडा पद्धती, मनुष्यबळाची अडचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींचा विचार करून सुभाष देशमुख गेली अकरा वर्षे लोकमंगलतर्फे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत आहेत. आतापर्यंत एकूण २२४८ जोडपी लोकमंगल सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहेत.
ही चळवळ केवळ सोलापूरपुरती मर्यादित न राहता उस्मानाबादमध्येही गेली पाच वर्षे असे सोहळे होत आहेत. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची सोय, मामांना मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणीमंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहे. तसेच स्वयंपाकघरात लागणारी भांडीही दिली जाणार आहेत.
मुलगी वाचवा अभियानांतर्गत विवाह सोहळ्यातील वर-वधूंना जर मुलगी झाली तर त्या मुलीच्या व फाउंडेशनच्या संयुक्त नावाने २००० रुपयांची ठेव योजना सुरू केली आहे. आतापर्यंत १२५ जणांच्या नावे ठेव केलेली आहे. लोकमंगल सोहळ्यातील जोडप्यास त्यांच्या शिक्षणाप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते आणि वधू-वरास व्यवसायासाठी कमी दराने कर्जही देण्यात येते. (प्रतिनिधी)