शहरातून अद्याप ५५ अल्पवयीन बालके बेपत्ता

By admin | Published: July 11, 2017 03:33 AM2017-07-11T03:33:02+5:302017-07-11T03:33:02+5:30

अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला.

55 minor children missing from the city yet | शहरातून अद्याप ५५ अल्पवयीन बालके बेपत्ता

शहरातून अद्याप ५५ अल्पवयीन बालके बेपत्ता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अल्पवयीन मुले बेपत्ता असल्याच्या प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला. पोलिसांच्या तपास कार्यावर पालक समाधानी आहेत का? हे देखील त्यांनी पालकांसोबतही सुसंवाद साधून जाणून घेतले. सद्यस्थितीला आयुक्तालय क्षेत्रातून अद्यापही बेपत्ता असलेल्या ५५ बालकांचा शोध घेण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
केंद्र शासनाच्या निदेशानुसार राज्यात ‘मुस्कान आॅपरेशन तीन’ हा उपक्रम राबवला जात आहे. हरवलेल्या अल्पवयीन बालकांच्या विशेष शोधमोहिमेच्या या उपक्रमात पहिल्याच वर्षी नवी मुंबई पोलिसांनी राज्यात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. शहरातून अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याचे प्रकार सुरूच आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार १८ वर्षांखालील मुलगा अथवा मुलगी हरवल्यास त्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला जात आहे. अशा गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांकडून देखील तपासाला प्राधान्य दिले जात आहे. तर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक पथक देखील याकामी सक्रिय आहे. नवी मुंबई आयुक्तालयातून चार वर्षांत सुमारे ८०० बालके हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे ७४५ बालकांचा शोध लागलेला आहे. मात्र अद्यापही ५५ बालकांचा शोध लागलेला नसून त्यामध्ये सुमारे ३० मुलींचा समावेश आहे. काही मुले घरगुती वादातून स्वत:हून पळालेली आहेत, तर काही व्यसनाधीन होवून गुन्हेगारी प्रवृत्ती जडल्याने घर सोडून गेली आहेत. त्यापैकी काहींना यापूर्वी पोलिसांनी शोधून पालकांच्या ताब्यात दिल्यानंतरही पुन्हा ती पळालेली आहेत. त्याशिवाय प्रेमात फूस लावून पळवलेल्या काही अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश आहे.
मागील सुमारे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हे गुन्हे निकाली निघावेत यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे प्रयत्नशील आहेत. त्याकरिता सोमवारी कळंबोली पोलीस मुख्यालय येथे हरवलेल्या बालकांचे पालक व तपास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. आयुक्त नगराळे यांच्यासह सह आयुक्त प्रशांत बुरडे, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, उपआयुक्त राजेंद्र माने, डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह ४० हून अधिक पालक व सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. यावेळी नगराळे यांनी प्रत्येक गुन्ह्याची सखोल चौकशी करून तपास अधिकाऱ्याकडून गुन्ह्याचा सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच पोलिसांच्या तपासकार्यावर पालक समाधानी आहेत का ? याची चौकशी केली. तर हरवलेली ही मुले सापडावीत याकरिता त्यांच्याविषयीची काही माहिती मिळतेय काय या अनुषंगाने देखील पालकांसोबत चर्चा करण्यात आली.
नवी मुंबई आयुक्तालयातून चार वर्षांत सुमारे ८०० बालके हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी सुमारे ७४५ बालकांचा शोध लागलेला आहे.

Web Title: 55 minor children missing from the city yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.