पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

By admin | Published: May 25, 2017 02:27 AM2017-05-25T02:27:36+5:302017-05-25T02:27:36+5:30

रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले.

55 percent polling in Panvel, Bhiwandi | पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

पनवेल, भिवंडीमध्ये ५५ टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल/भिवंडी : रायगड जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पनवेल महापालिका आणि भिवंडी महापालिका निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले. भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेसाठी बुधवारी झालेली निवडणूक महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा शांततेत पार पडली.
पनवेल महापालिकेसाठी ४१८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ५७० मतदान केंद्रांवर ५३ टक्के मतदान झाले. सुट्यांचे दिवस असल्याने अनेक मतदार गावी गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदार सकाळपासूनच बाहेर पडल्याचे दिसून आले. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मात्र, खारघरमध्ये अपक्ष उमेदवार किरण नरसिंग मोरे यांना अज्ञात इसमांनी मारहाण करून पळ काढला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्ते मतदारांच्या घरापर्यंत पोहोचले होते, तर अनेकांनी मतदारांना गावावरून आणण्यासाठी गाड्यादेखील पाठविल्या होत्या. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारी ४नंतर मतदारांचा मतदार केंद्रांबाहेर ओघ पाहावयास मिळाला. ४ वाजेपर्यंत मतदानाचा टक्का ४५पर्यंत पोहोचला होता.
पनवेल महापालिकेच्या या निवडणुकीवर २०१९मधील विधानसभेचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चुरस सुरू आहे. अडीच हजार पोलिसांना विविध मतदार केंद्रांबाहेर तैनात करण्यात आले होते. मतदारांना ने-आण करण्यासाठी उमेदवारांनी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामुळे मतदान केंद्रांबाहेर काही प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती.
भिवंडी-निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत साधारण ७ ते ८ ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. या निवडणुकीत १५० कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आल्याची माहिती डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. नंतरच्या दर दोन तासांनी त्यात सरासरी १० टक्क्यांनी वाढ होत होती. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. त्यानुसार, साधारणत: ५.३० वाजेपर्यंत अंदाजे ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला.

‘‘भयमुक्त परिस्थिती निर्माण करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. तसेच पोलिसांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्यामुळे निश्चितपणे मागील वर्षीपेक्षा यंदा मतदान जास्त झाले आहे.’’
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, भिवंडी- निजामपूर शहर महापालिका

काँग्रेसकडून एकही तक्रार नाही
मतदानाच्या काळात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून आयुक्तांकडे वारंवार तक्रारी येत होत्या. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाकडून एकही तक्रार आली नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
 

Web Title: 55 percent polling in Panvel, Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.