वर्षासहलीसाठी गेलेल्या मुंबईतील ५५ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका
By admin | Published: June 27, 2017 03:19 AM2017-06-27T03:19:14+5:302017-06-27T03:19:14+5:30
माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे.
गिरीश गोरेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव तालुक्यातील भिरा परिसरात वर्षापर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील जवळपास ५५ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. हे विद्यार्थी तेथील देवकुंड भागातील नदीपात्रापलीकडे धबधब्यावर गेले होते. जवळपास दोन तास हे बचावकार्य सुरू होते.
मुंबईतील पोदार कॉलेज, केळकर कॉलेज व एच. आर. कॉलेज अशा तीन महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थी कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंड येथील धबधब्यावर रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले. या ठिकाणी देवकुंड व इतर धबधबे एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार झाला असून, येथूनच कुंडलिका नदी उगम
पावते. त्या दोन्ही प्रवाहांत सदर ५५ विद्यार्थी सहलीची मौजमजा घेण्यासाठी आले होते. मात्र, दुपारनंतर पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी धावपळ झाली. याच धावपळीत तानेश चेतन बोरकर (१७ रा. मुंबई), हा विद्यार्थी दोन्ही प्रवाहाच्या पलीकडे वाहत गेल्याने जखमी झाला आणि दुसऱ्या बाजूस अडकला होता.
इतर विद्यार्थ्यांना नदी ओलांडून येणे शक्य नव्हते व पाण्याचा प्रवाह वाढत होता. त्यामुळे मनजित ठाकूर याने मोबाइलद्वारे रायगड पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तेथील परिस्थिती कळवली. त्यानंतर माणगाव पोलीस ठाणे अंमलदार म्हात्रे यांनी रावळजे दूरक्षेत्र येथे पेट्रोलिंग करत असलेले माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, कर्मचारी अनिल वडते, रमेश बोडके तसेच टेकाडे यांनी विरेंद्र सावंत यांचे, दैव राफ्टिंगचे पथक घेऊन धबधब्याच्या ठिकाणी धाव घेतली. पोलीस आणि राफ्टिंगच्या पथकाच्या मदतीने दोन ते अडीच तास निकराचे प्रयत करून, सर्व विद्यार्थ्यांची सायंकाळी उशिरापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली.