55 हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचा आज शुभारंभ
By admin | Published: December 24, 2016 05:09 AM2016-12-24T05:09:47+5:302016-12-24T05:09:47+5:30
मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास येत्या पाच ते सहा वर्षानंतर अधिक सुकर व वेगवान होण्याची आशा आहे. एमआरव्हीसीतर्फे
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचा प्रवास येत्या पाच ते सहा वर्षानंतर अधिक सुकर व वेगवान होण्याची आशा आहे. एमआरव्हीसीतर्फे तब्बल ५५ हजार कोटी रुपये किंमतीचे विविध रेल्वे प्रकल्प राबविले जाणार आहेत. या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत शनिवारी केला जाईल. यामध्ये एमयुटीपी- ३, वांद्रे ते विरार एलिव्हेटे,सीएसटी ते विरार एलिव्हेटेड आणि पनवेल-वसई-विरार कॉरीडोर यांचा समावेश असल्याची माहिती एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन), मध्य व पश्चिम रेल्वेकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे एमयुटीपी-३ अंतर्गत ४७ नव्या स्वयंचलित दरवाजाच्या लोकलही दाखल होतील. या लोकल संपूर्ण एसी असाव्यात कि त्याचे काही डबे एसी असावेत यावर विचारविनिमय सुरु असल्याचे एमआरव्हीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
एमआरव्हीसीच्या एमयुटीपी-३ मधील ११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली. यामध्ये विरार-डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ नव्या लोकल, रेल्वे रुळ ओलांडणे याचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष प्रभात सहाय यांनी दिली. त्याव्यतिरिक्त वांद्रे ते विरार, सीएसटी ते पनवेल आणि विरार-वसई-पनवेल या तीनही प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. यातील विरार-पनवेल प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळणे बाकी असल्याचे सांगितले. त्याला अंतिम मंजुरी मिळताच प्रथम याच प्रकल्पाच्या कामाला त्वरीत सुरुवात केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लागताच मुंबई उपनगरीय लोकलची प्रवासी क्षमता आणखी २0 लाखांनी वाढणार आहे.
प्रथम एक लोकल मुंबईत दाखल होताच त्याची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर ऊर्वरीत लोकलमध्ये काही बदल करायचे कि नाही त्याचा निर्णय घेतला जाईल. या लोकल चेन्नईतील रेल्वेच्या फॅक्टरीत बनवण्याचा विचार आहे. दाखल होणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांसाठी सोयिसुविधाही दिल्या जातील,अशी माहिती सहाय यांनी दिली.
एसी लोकलचा प्रवास अधांतरीच-
सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल अजूनही सेवेत दाखल झालेली नाही. याबाबत उपस्थित पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल यांना विचारले असता, त्यांनी एसी लोकल धावणार मात्र ती कुठे याबाबत त्यांनी स्पष्ट केले नाही. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या आहे. त्यामुळे त्यातून काही मार्ग निघतो का ते तपासून पाहात असल्याचे सांगितले.