राज्यातील ५,५०० सहकारी संस्थांची नोंदणी रद्द
By admin | Published: February 25, 2016 04:09 AM2016-02-25T04:09:11+5:302016-02-25T04:09:11+5:30
कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५१ हजार ७४ सहकारी संस्थांपैकी ५ हजार ५०१ संस्थांची नोंदणी सहकार खात्याने रद्द केली आहे. या दणक्यामुळे सहकारी
पुणे : कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्रीच नोंदणी असलेल्या राज्यातील ५१ हजार ७४ सहकारी संस्थांपैकी ५ हजार ५०१ संस्थांची नोंदणी सहकार खात्याने रद्द केली आहे. या दणक्यामुळे सहकारी संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. रद्द करण्यात आलेल्या संस्थांपैकी ११८ संस्था या पुणे जिल्ह्यातील आहेत.
राज्यात सुमारे दोन लाख २८ हजार सहकारी संस्थांची नोंदणी सहकार खात्याकडे आहे. नोंदणी केल्यानंतर यातील अनेक संस्थांनी अनेक वर्षांपासून आपली कोणतीही स्थिती शासनाला कळवलेली नव्हती. त्यामुळे या संस्था अस्तित्वात आहेत का, त्यांची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी सहकार खात्याकडून जुलै ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात ५१ हजार ७४ संस्था बंद, प्रत्यक्ष कार्य करीत नसल्याचे व नोंदणी केलेल्या जागेवर नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे या सर्व संस्थांना नोंदणी रद्द करण्यासाठीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ५०१ संस्थांची तपासणी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यात या संस्थांची केवळ कागदोपत्रीच नोंद असल्याचे दिसून आले. या संस्था नोंदविण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचे कामकाज स्थगित आहे; तसेच काही संस्थांनी दिलेल्या पत्त्यावर संस्था अस्तित्वात नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रद्द झालेल्या संस्थांमध्ये सुमारे तीन हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्याचबरोबर नागरी ग्रामीण पतपुरवठा संस्था, नागरी बँका, नोकरदार पतपुरवठादार संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी पतसंस्था आदींचाही यात समावेश आहे.
रद्द करण्यात आलेल्या सहकारी संस्थांमध्ये पुणे जिल्ह्यातील ११८ संस्था आहेत. त्यांपैकी ११५ संस्था या ग्रामीण भागातील व ३ संस्था या पुणे शहरातील आहेत. २८ संस्था सोलापूर जिल्ह्यातील आहेत.