जुलैतील अतिवृष्टीग्रस्तांना 554 कोटींचा दिलासा; सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला, सर्वात कमी जळगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:15 PM2021-09-19T13:15:51+5:302021-09-19T13:16:07+5:30
या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे.
नारायण जाधव -
ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका संपूर्ण राज्याला बसला होता. शेतपिकांच्या नुकसानीसह घरे, दारे, गुरे, ढोरे, गोठे यांच्या नुकसानासह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अखेर दोन महिन्यांनी का होईना महाविकास आघाडी सरकारने या अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजाराचा पहिला हप्ता गुरुवारी वितरित केला.
या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे. विभागवार विचार करता सर्वाधिक रक्कम पुणे आणि कोकण विभागास तर सर्वात कमी नाशिक विभागास दिली आहे. यात जळगावच्या हातात तर अवघे ४० हजार टिकवले आहेत.
कोकणातील ठाणे जिल्ह्याला ४२ कोटी ९० लाख ९४ हजार तर पालघर जिल्ह्याला दोन कोटी ६८ लाख ४४ हजार अशी ४५ कोटी ५९ लाख ३८ हजार, रायगडला ६० कोटी ४१ लाख ३६ हजार, रत्नागिरीला ४४ कोटी २९ लाख १७ आणि सिंधुदुर्गास सहा कोटी ९४ लाख ४५ हजार रुपयांची मदत दिली आहे.
जुलैत कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांचे संसार वाहून गेले होते. या सर्वांना महाविकास आघाडी सरकारकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा होती.
विभागवार मदत व रक्कम
पुणे विभाग : ३१६ कोटी ३८ लाख ४९ हजार
कोकण विभाग : १५७ कोटी ७१ लाख ९९ हजार
अमरावती विभाग : ६७ कोटी २४ लाख १८ हजार
नागपूर विभाग : १० कोटी ४८ लाख ४० हजार
मराठवाडा विभाग : ३ काेटी ३ लाख ७ हजार
नाशिक विभाग : १ लाख ४० रुपये