जि.प., पं.स.साठी ५५७ उमेदवार रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 03:47 AM2017-02-14T03:47:10+5:302017-02-14T03:47:10+5:30
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना
आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून तब्बल ३७३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यांच्यासह अन्य पक्षातील ५५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचे रणांगण सभा, रॅली, आरोप- प्रत्यारोपांनी चांगलेच तापणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार आहे.
निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बहुतांश राजकीय पक्षातील बंडोबांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे राहिले होेते. बंडोबांना थंड करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी राजकीय डावपेच आखत त्यांना थंड करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १३५ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर ११८ पंचायत समितीच्या जागांसाठी २३८ उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणामध्ये आता ३७४ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.