राज्यात पाचव्या टप्प्यात 56.89 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 04:36 PM2024-05-22T16:36:24+5:302024-05-22T16:37:12+5:30
राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात सोमवारी झालेल्या मतदानात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती रात्री उशिराने निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात एकूण ६६.७५ टक्के तर सर्वात कमी मतदान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के झाले आहे. विधानसभानिहाय मतदारसंघात पाचव्या टप्प्यात दिंडोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.
राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार १३ मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात ६६.७५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या १३ मतदारसंघातील जवळपास चार मतदारसंघात ६० आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का पोहोचला आहे. कल्याण मतदारसंघात ५०.१२ टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सर्वात जास्त मतदान दिंडोरी विधानसभेत
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.४२ टक्के मतदान झाली आहे. या आकडेवारीनुसार एकूण ८ विधानसभा मतदारसंघांत ७० आणि ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यात भिवंडी ग्रामीण ७२,६६ टक्के, डहाणू ७३.७५ टक्के, इगतपुरी ७२.२४ टक्के, कळवण ७०.८९ टक्के, पालघर ७०.३४ टक्के, शहापूर ७०२६ टक्के आणि विक्रमगड ७४.४५ टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.
... येथे ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान
सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहे. कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. या आठ मतदारसंघांत ऐरोली ४८.४७ टक्के, अंबरनाथ ४७.०७ टक्के, भिवंडी पूर्व ४९.८७ टक्के, चांदिवली ४९.४३ टक्के, कुलाबा ४३.६८ टक्के, धारावी ४८.५२ टक्के, मिरा भाईंदर ४८.९५ टक्के आणि मुंब्रा कळवा ४८.७२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.