राज्यातील ५६ टक्के बालके, महिला रक्तक्षयामुळे त्रस्त; राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:48 AM2020-12-21T05:48:44+5:302020-12-21T05:49:18+5:30
National Family Survey : देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते.
- बाबूराव चव्हाण
उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा केली आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ५६ टक्के बालके, गराेदर माता आणि महिला रक्तक्षयाने (ॲनिमिया) त्रस्त आहेत. ही धक्कादायक बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणाच्या (एएफएचएस-५) अहवालातून उजेडात आली आहे.
देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते. या सर्वेक्षणातून राज्यातील ६ ते ५९ महिन्यांच्या आतील बालके, १५ ते ५९ वयाेगटातील महिला आणि गराेदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सरासरी ५०.३ टक्के एवढे हाेते. मात्र, आता हेच प्रमाण थेट ५६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा आणि जिल्हास्तरीय यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालके यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ६८.९ टक्क्यांवर
बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ५३.८ टक्के एवढे हाेते. यामध्ये वाढ हाेऊन ते ६८.९ टक्क्यांवर गेले आहे. महिलांतील रक्तक्षयाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून थेट ५४.५ टक्के एवढे झाले आहे. गराेदर मातांतील रक्तक्षयाचे प्रमाण काहीअंशी खाली आले असले तरी फारसे समाधानकारक नाही. चार वर्षांपूर्वी ४९.३ टक्के गराेदर माता रक्तक्षयाने त्रस्त हाेत्या. तर ताज्या अहवालानुसार ४५.७ टक्के मातांमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे.
दृष्टिक्षेपात महाराष्ट्र...
रक्तक्षय एनएफएचएस-४ एनएफएचएस-५
बालके ५३.८ ६८.९ टक्के
महिला ४७ ५४.५ टक्के
गराेदर माता ४९.३ ४५.७ टक्के
असे हाेतात दुष्परिणाम
लहान मुले : कुपाेषण वाढीस लागून वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे, खेळण्याची क्रियाशीलता कमी हाेणे, अभ्यासावरील लक्ष कमी हाेणे, वारंवार थकवा येणे, बालमृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता असते.
गराेदर माता : रक्तक्षयाचे प्रमाण वाढल्यास गर्भपात हाेणे, कमी दिवसांची प्रसूती, गर्भारपणात रक्तदाब वाढणे, वारंवार जंतुसंसर्ग हाेणे, प्रसूतिदरम्यान रक्तस्राव हाेणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपण व बाळंतपणानंतर अन्य आजारांची लागण हाेते. यातूनच माता मृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता बळावते.