नवीन रेल्वे मार्गाला ५६ कोटी
By Admin | Published: March 24, 2017 01:43 AM2017-03-24T01:43:28+5:302017-03-24T01:43:28+5:30
राज्य शासनाने राज्यातील नवीन रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली.
मुंबई : राज्य शासनाने राज्यातील नवीन रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. त्यानुसार वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला शासनाकडून ५६ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम आधीच सुरू झाले असून प्राप्त होणाऱ्या निधीमुळे काम पुढे सरकणार आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग बनत असून त्याचा एकूण खर्च हा २ हजार ५0१ कोटी रुपये आहे. यातील खर्चापैकी ४0 टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार कोटी ४२ लाख रुपये राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
रेल्वे मंत्रालयाने फेब्रुवारी २0१७ अखेर यासाठी ३६६ कोटी ७१ लाख खर्च केले. यंदाच्या मार्चअखेरपर्यंत आणखी ३५ कोटी खर्च केले जातील.
राज्य शासनाचा ४0 टक्के हिस्सा यात असल्याने त्यानुसार १५ मार्च २0१७ पर्यंत १९७ कोटी ३२ लाख रुपये निधी प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)