बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 06:14 AM2023-12-23T06:14:16+5:302023-12-23T06:14:30+5:30
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महापुरुषांच्या नावाचा फलक लावण्यावरून वाद विकोपाला गेल्यानंतर ५६ दलित कुटुंबांनी चिल्यापिल्यांसह धान्य, कपड्यांसह बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले. ही कुटुंबे मजल-दरमजल करत शुक्रवारी सकाळी गडचिरोलीत दाखल झाली. मुख्य चौकात निषेध सभा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचविणारी ही घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगावात घडली.
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे.
चामोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावरील नवरगाव हे ६६६ लोकसंख्येचे गाव. येथे सर्व लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे. हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, ग्रामसभेने अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पोलिस बंदोबस्तात फलक हटविला. त्यानंतर दलित समाजाने तीव्र रोष व्यक्त करत बिऱ्हाड घेऊन गाव सोडले.
ग्रामसभेत ठराव घेऊनच फलकांबाबतचे निर्णय घेतले आहेत. सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरही ग्रामसभेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अशोभनीय आहे. गावात सलोखा राहावा, हीच आमची भूमिका आहे.
- खुशाल कुकडे, सरपंच, नवरगाव