‘५६ इंचांची छाती असलेले सरकार आता गप्प का?’
By admin | Published: May 3, 2017 04:16 AM2017-05-03T04:16:06+5:302017-05-03T04:16:06+5:30
नोटाबंदी केल्यानंतर दहशतवादी हल्ले होणार नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पण नोटाबंदीनंतरही हल्ले सुरूच
मुंबई : नोटाबंदी केल्यानंतर दहशतवादी हल्ले होणार नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. पण नोटाबंदीनंतरही हल्ले सुरूच आहेत. भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यापर्यंत पाकिस्तानी सैन्याची मजल गेली असून, ५६ इंचांच्या छातीवाले केंद्र सरकार आता गप्प का आहे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.
भारतीय जवानांच्या हत्येचा तीव्र निषेध करतानाच चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली असून, हिंसाचाराच्या घटनाही वाढतच आहेत. भाजपाचे काश्मीर धोरण अपयशी ठरले असून, केंद्राच्या नाकर्तेपणामुळे काश्मीर अशांत झाले आहे. पाकिस्तानने एका भारतीय सैनिकाला मारले तर पाकच्या दहा सैनिकांचा शिरच्छेद करण्याच्या वल्गना करणारे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करणारे नरेंद्र मोदी आता पंतप्रधान आहेत व सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री आहेत. तरीही पाकिस्तानच्या कुरापती का कमी झाल्या नाहीत, असा सवाल करत कठोर धोरण स्वीकारण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. (प्रतिनिधी)