महानगरपालिकांसाठी 56; तर जिल्हा परिषदसाठी 69 टक्के मतदान
By admin | Published: February 21, 2017 08:57 PM2017-02-21T20:57:06+5:302017-02-21T21:02:21+5:30
राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21: राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील 4 पंचायत समित्या आणि त्यांतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे 6 निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या 12 निर्वाचक गणांत 73 टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या 2 निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या 4 निर्वाचक गणांत 68.99 टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी 52 टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी 68.99 टक्के मतदान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी: बृहन्मुंबई- 55, ठाणे- 58, उल्हासनगर- 45, पुणे- 54, पिंपरी-चिंचवड- 67, सोलापूर- 60, नाशिक- 60, अकोला- 56, अमरावती- 55 आणि नागपूर- 53. एकूण सरासरी- 56.30.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी अशी: रायगड- 71, रत्नागिरी- 64, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 68, पुणे- 70, सातारा- 70, सांगली- 65, सोलापूर- 68, कोल्हापूर- 70, अमरावती- 67 आणि गडचिरोली- 68. सरासरी- 69.43.