मराठवाड्याला विजेसाठी ५६० कोटी
By admin | Published: March 5, 2016 04:06 AM2016-03-05T04:06:00+5:302016-03-05T04:06:00+5:30
बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले
लातूर : बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले. कोकणातून चारा आणून विभागीय आयुक्तांमार्फत चारा डेपो सुरु करणार असून उजनी-उस्मानाबादची योजना १६ एमएलडी करण्याच्या १३.४४ कोटीच्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली. लातूरला टंचाईसाठी १५ कोटीसह तब्बल सात वेळा मंजूर होऊन न झालेल्या भंडारवाडीच्या ३७ कोटीच्या प्रस्तावाला पुन्हा मंजुरी इतकेच काय ते लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे फलित.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा छावण्यांसाठी आणखी ५० कोटी वाढविल्याचे सांगितले. रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे दर जुन्या डीएसआरने १८१ रुपयेअसून ते देखील वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर आणि डुबकी घेण्यासाठी घालून दिलेल्या आर्थिक निकषांच्या मर्यादा दुप्पट केल्या आहेत. गावातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील आणि केशरीमधून हुकलेल्या शेतमजुरांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गव्हू योजनेत विनाशर्त सामावून घेण्यात येणार आहे. मराठवाड्यात १७९९ टँकर सुरु असून त्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्याच्या पेरणी हंगामासाठी कृषी विभाग जे बियाणं पुरवितं त्यात दुप्पट वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील शैक्षणिक फी माफीचा विस्तार आणखी वाढविण्याचा प्रस्ताव शिक्षणमंत्र्यांकडे दिला असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी काही द्यायला आलो नाही तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात की नाही, हे पहायला आलो आहे, असे सांगून शेतकऱ्यांचा अक्षरश: भ्रमनिरास केला.
सरकारने केलेल्या कर्तबगारीचे दाखले देत स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. आत्महत्या करू नका,’ असे आवाहन करून कोरडा दिलासा दिला.