५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना
By admin | Published: July 28, 2016 04:23 PM2016-07-28T16:23:45+5:302016-07-28T16:23:45+5:30
शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे.
विवेक चांदूरकर
बुलडाणा : शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कधीकाळी राज्यात एक नंबर असलेली भू - विकास बँकेचे जाळे संपूर्ण राज्यात पसरले होते. मात्र, कालांतराने व्यावसायिक स्पर्धेत कमी पडल्यामुळे सदर बँक मागे पडली. भाजप व शिवसेनेच्या सरकारने भू - विकास बँक बंद करण्याची घोषणा केली. या बँकेत संपूर्ण राज्यात ५६० कर्मचारी आहेत. तसेच २५७१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना ३६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ५६० कर्मचाऱ्यांचे शासनाने १७४ कोटींचे वेतन थकीत आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १८० कोटी शासनाला देणे आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले कर्ज वसूल करून वेतन घेण्याचे आदेश दिले आहेत.
दुसरीकडे बँक बंद झाल्याच्या घोषणेमुळे शेतकरी थकीत कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २५७१ कर्मचारी वेतनाविनाच सेवानिवृत्त झाले आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. वेतन देण्याच्या मागणीकरिता तसेच अन्य खात्यात समायोजन न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतरही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केल्यावरही शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
आमदारांच्या पत्रांना केराची टोपली
भू - विकास बँकांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे अन्य खात्यात समायोजन करण्याची मागणी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ, चिखलीचे आ. राहूल बोंद्रे व आ. डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर विधानभवनात अनेकदा आमदारांच्यावतीने आवाजही उठविण्यात आला आहे. मात्र,त्यानंतरही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली. तर विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली.
- आमचे ३६ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासनाने बँक बंद झाल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे आम्हाला वुसली करण्याचे सांगत आहेत. राज्यातील ५६० कर्मचारी तसेच २५७१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली
आहे. शासनाने बँकेतील कर्मचाऱ्यांचे अन्य खात्यात समायोजन करायला हवे.
- ए. एस. जाधव, शाखा व्यवस्थापक, भू - विकास बँक, बुलडाणा.