तब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 07:30 AM2020-09-25T07:30:18+5:302020-09-25T07:30:32+5:30

पाच महिन्यांतील आकडेवारी; कोरोना काळात घरगुती वीज ग्राहकांकडे सर्वाधिक थकबाकी

5,742 crore electricity bills defaulted | तब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली

तब्बल ५,७४२ कोटींची वीज बिले थकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा फटका महावितरणच्या बिल वसुलीवरही बसला. एप्रिल ते आॅगस्ट, २०२० या पाच महिन्यांत थकबाकी तब्बल ५ हजार ७४२ कोटींवर झेपावली. त्यात सर्वाधिक ३ हजार ५२१ कोटींची थकबाकी घरगुती वीज ग्राहकांकडे आहे. सरकारने केलेली आणि प्रत्यक्षात न आलेली वीज बिल माफीची घोषणा हेसुद्धा यामागचे प्रमुख कारण असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


एप्रिल ते आॅगस्ट, २०१९ या कालावधीत घरगुती वीज ग्राहकांना ८ हजार ९४९ कोटींची बिले पाठविण्यात आली होती. त्यापैकी ८,१०७ कोटींचा भरणा ग्राहकांनी केला. यंदा याच कालावधीत महावितरणने ९ हजार १० कोटींची बिले पाठवली असून ग्राहकांनी जेमतेम ५,४८९ कोटीच जमा केल्याची माहिती हाती आली आहे.


मार्च ते मे या महिन्यांतील सरासरी बिलांमुळे घरगुती वीज ग्राहकांना जून आणि जुलैमध्ये भरमसाट बिले आली होती. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर सरकारने या वीज बिलांमध्ये सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, सवलत दिल्यास राज्याच्या तिजोरीवर भार वाढेल, अशी सबब देत वित्त विभागाने प्रस्तावित बिल माफीला अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही.


वीज बिले माफ होतील या आशेपोटी अनेकांनी बिलांचा भरणा नाही. यापुढेही काहीतर होईल आणि बिले माफ होतील, या आशेवर अनेक ग्राहक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात औद्योगिक कारखाने बंद होते. अनलॉक प्रक्रियेदरम्यान निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर वीज मागणीत वाढ झाली. गेल्या पाच महिन्यांत राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांना १० हजार ३७२ कोटींची बिले दिली असून त्यापैकी ८८८२ कोटींचा भरणाही झाला आहे. महावितरणने पाच महिन्यांत एकूण २२ हजार ५९ कोटींची बिले पाठवली असून त्यापैकी १६ हजार ३२६ कोटींची वसुली झाली आहे. सर्वाधिक औद्योगिक ग्राहकांकडे १४९० आणि व्यावसायिक ग्राहकांकडे ७३१ कोटींची थकबाकी आहे.


व्यावसायिक आस्थापनांचे आस्ते कदम
अनलॉकच्या टप्प्यात व्यावसायिक आस्थापनांना परवानगी दिली जात असली तरी त्यांचा वापर आजही पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे तेथील विजेची मागणी ३४ टक्क्यांनी कमीच आहे. गेल्या पाच महिन्यांत या आस्थापनांना २ हजार ६७७ कोटींची बिले देण्यात आली असून त्यापैकी १९४६ कोटींची बिले या व्यावसायिकांनी भरली आहेत.

Web Title: 5,742 crore electricity bills defaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.