५७५ गोविंदांवर कारवाईचा बडगा
By admin | Published: August 26, 2016 04:47 AM2016-08-26T04:47:19+5:302016-08-26T04:47:19+5:30
दहीहंडी दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकातील सदस्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला
मुंबई : दहीहंडी दरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या गोविंदा पथकातील सदस्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. बाईकवर ट्रिपल सीट, विना हेल्मेट आणि दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करत मुंबई शहर व उपनगरात कारवाई करण्यात आली. यात एकूण ५७५ जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सर्वाधिक कारवाई ही विना हेल्मेट आणि ट्रिपल सीटविरोधात करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोविंदा पथकांकडून दहीहंडीतील सदस्यांसाठी मोठ्या प्रमाणात बाईक, ट्रक व टेम्पोची सोय केली जाते. मोठ्या प्रमाणात गोविंदा मंडळांकडे ताफा असल्याने अशावेळी वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन गोविंदांकडून केले जाते. त्यामुळे अपघातांचा धोकाही संभवतो. हे पाहता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविदांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. अनेक गोविंदा हे बाईकवर ट्रिपल सीट असतात. अशा बाईकस्वारांवरही कारवाई करण्यात आली असून जवळपास २२२ जण वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्याचप्रमाणे ३५१ विना हेल्मेट बाईकस्वारांवरही कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यात सर्वाधिक कारवाई कुर्ला, कुलाबा, बोरीवली, भायखळा, दादर परिसरात झाली आहे. गोविंदाकडून दारु पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. वडाळा आणि कांदिवली येथे केलेल्या कारवाईत अवघे दोन जण आढळले. ट्रकवर किंवा टेम्पोवर लटकून तसेच त्याच्या टॉपवर बसून प्रवास करणाऱ्या गोविंदावर मागील वर्षी कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला असतानाच यंदा त्यांना वाहनातून उतरवून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. अशा वाहनांच्या क्रमांकांची नोंद वाहतूक पोलिसांनी घेतली. महत्वाची बाब म्हणजे नुकतीच एका वाहतूक पोलिसाला पेट्रोल पंपावर एका बाईकस्वाराकडून मारहाणीची घटना घडली होती. त्यामुळे अशी घटना घडू नये यासाठी ज्या ठिकाणी एकच वाहतूक पोलिस तैनात आहे, अशा पोलिसांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबर प्लेटची माहीती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)
>मागील वर्षी ८२0 बाईकस्वारांना ट्रिपल सीट महागात पडली होती. यंदा त्याचे प्रमाण कमी झालेले दिसते. तर ट्रकवर लटकून प्रवास करणाऱ्या ६0 केसेसची नोंदही झाली होती.मुंबई शहर व उपनगरातील रस्त्यांवर १७ मोठ्या दहिहंड्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांना होणारी गर्दी पाहता मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.५७५ गोविंदांवर कारवाई करताना काहींना दंड तर काही गोविंदाकडे पैसे नसल्याने लायसन्स जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.