साठे महामंडळातील ५८ कर्मचारी बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:26 AM2020-07-29T05:26:32+5:302020-07-29T05:27:01+5:30
अवैध भरती : रमेश कदम यांच्या कार्यकाळातील घोटाळा
यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तब्बल ३५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांनी गाजलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात अवैध भरती करण्यात आलेल्या ५८ कर्मचारी, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दणक्यानंतर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे यांनी आदेश काढले.
या ५८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश मुंडे यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. त्यातील सर्व कायदेशीर बाबी तपासून बगाडे यांनी कारवाईचा बडगा उचलला. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत.
ते महामंडळाचे अध्यक्ष असताना घोटाळ्यांवर घोटाळे झाले होते आणि त्यात कर्मचारी भरतीचाही समावेश होता. शैक्षणिक पात्रता न बघता, शासनाची कोणतीही मान्यता न घेता आणि भरतीची कायदेशीर प्रक्रिया न राबविताच या तब्बल ७४ कर्मचाºयांची महामंडळात भरती करण्यात आली होती. त्यातील ९ कर्मचाºयांनी ते कदम महामंडळात येण्यापूर्वी रोजंदारीवर नोकरीला लागले होते आणि आधीच्या असे कारण पुढे करत काही राजकीय नेत्यांच्या मदतीने स्वत:चा बचाव करून घेतला. त्यामुळे ते बडतर्फीच्या कारवाईतून तूर्त वाचले आहेत. तथापि, त्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही सामाजिक न्याय विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
७ कर्मचाºयांनी न्यायालयातून स्थगिती मिळवत बचाव करून घेतला.
५८ जणांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. त्यात उपमहाव्यवस्थापक वैशाली मुंदळे यांच्यासह मुंबई मुख्यालय, पुणे, नागपूर, लातूर, अमरावती, नाशिक आदी ठिकाणच्या महामंडळातील कर्मचाºयांचा समावेश आहे. विभागीय चौकशीत सात आरोप सिद्ध झालेल्या एका जिल्हा व्यवस्थापकास अभय मिळाले.
१० लाखांपर्यंतची कर्जे दिली
रमेश कदमांच्या काळात नोकºया देताना आर्थिक घोटाळेदेखील झाले. बºयाच कर्मचाºयांना आधीच्या तारखेत रुजू झाल्याचे दाखवत महामंडळाकडून १० लाखांपर्यंतची कर्जे दिली. नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात स्वीकारली गेली असा आरोप असून सीआयडी चौकशीत ही बाब समोर आली आहे. त्यात रमेश कदमचे निकटवर्ती/नातेवाइक तसेच महामंडळातील काही कर्मचारी/अधिकाºयांचाही समावेश होता.