पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ हरित इमारती

By Admin | Published: October 13, 2015 02:58 AM2015-10-13T02:58:30+5:302015-10-13T02:58:30+5:30

‘अनधिकृत बांधकामांचे शहर’ ही ओळख पुसून पिंपरी-चिंचवड आता ‘पर्यावरणपूरक इमारतीं’चे शहर म्हणून ओळखले जाणार आहे

58 green buildings in Pimpri-Chinchwad | पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ हरित इमारती

पिंपरी-चिंचवडमध्ये ५८ हरित इमारती

googlenewsNext

पिंपरी : ‘अनधिकृत बांधकामांचे शहर’ ही ओळख पुसून पिंपरी-चिंचवड आता ‘पर्यावरणपूरक इमारतीं’चे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. या शहरात आता ५८ ‘हरित इमारती’ उभ्या राहणार असून, त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या ५८ प्रकल्पांची ‘ग्रीहा’ या संस्थेकडे नोंद झाली असून, यामुळे सुमारे २२ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र हरित इमारतींमध्ये रूपांतरित होणार आहे.
पर्यावरण संवर्धन व संरक्षणास चालना देण्याच्या दृष्टीने ग्रीन रेटिंग फॉर इंटिगे्रटेड हॅबिटेट अ‍ॅसेसमेंट (ग्रीहा) आणि स्मॉल व्हर्सेटाईल अ‍ॅफॉर्डेबल ग्रीन रेटिंग फॉर इंटिगे्रटेड हॅबिटॅट अ‍ॅसेसमेंट (स्वग्रीहा) ही पद्धती महापालिकेने राबविली आहे. जे बांधकाम व्यावसायिक अथवा नागरिक आपले बांधकाम ग्रीहा व स्वग्रीहाशी अनुरूप बनवतील, त्यांना प्रीमियममध्ये सवलत दिली जाते, तसेच ग्रीहा व स्वग्रीहामधील घरमालकांना मिळकत करावरदेखील सवलती दिल्या जातात. केंद्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय आणि दि एनर्जी रीसर्च इन्स्टिट्यूट यांचे असोसिएशन आॅफ डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रीसर्च आॅफ सन्स्टेनेबल हॅबिटॅट या संस्थेमार्फत ग्रीहा व स्वग्रीहा ही ग्रीन रेटिंग सीस्टिम विकसित केली आहे.
अडीच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणाऱ्या इमारतींसाठी ‘ग्रीहा’ ही रेटिंग सीस्टिम लागू असून, अडीच हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या इमारतींसाठी ‘स्वग्रीहा’ ही रेटिंग सीस्टिम लागू आहे. या रेटिंग सीस्टिमचा मुख्य उद्देश पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक इमारती बनविणे, इमारतींच्या पर्यावरणपूरकतेचे मूल्यमापन करणे हा आहे. आतापर्यंत ५८ प्रकल्प ‘ग्रीहा’ यांच्याकडे नोंदले गेले आहेत. त्यामुळे सुमारे २२ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र हरित इमारतींमध्ये रूपांतरित होणार आहे. या माध्यमातून वीज, पाणी यांची बचत होण्याबरोबरच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सीस्टिम याचाही नागरिकांना फायदा होणार आहे.

Web Title: 58 green buildings in Pimpri-Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.