५८ किलो सोने लुटले
By admin | Published: April 25, 2015 04:30 AM2015-04-25T04:30:26+5:302015-04-25T04:30:26+5:30
मुंबईतून सोन्याची बिस्किटे घेऊन शिरपूरकडे निघालेले वाहन वाडीवऱ्हे गावापासून काही अंतरावर अडविले जाते. पोलिसांच्या वेषातील दरोडेखोर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चालक आणि सुपरवायझरचे हातपाय बांधतात
नाशिक : मुंबईतून सोन्याची बिस्किटे घेऊन शिरपूरकडे निघालेले वाहन वाडीवऱ्हे गावापासून काही अंतरावर अडविले जाते. पोलिसांच्या वेषातील दरोडेखोर रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चालक आणि सुपरवायझरचे हातपाय बांधतात आणि वाहनातील ५८ किलो सोन्याची बिस्किटे आपल्या बॅगेत भरून पोबारा करतात. एखाद्या चित्रपटात शोभून दिसावा असा थरारक प्रकार नाशिक महामार्गावर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला़
शिरपूर येथील एका व्यापाऱ्याने अंधेरी (मुंबई) येथील दोन दुकानांतून ६० किलो सोन्याची खरेदी केली होती. ते सोने शिरपूर येथील गोल्ड रिफायनरीमध्ये सुरक्षितरीत्या पोचविण्याची जबाबदारी अंधेरी येथील सिक्वेल सिक्युअर या खासगी सुरक्षा कंपनीवर सोपविली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास या सुरक्षा कंपनीचा चालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे आणि संतोष साहू, सुपरवायझर समीर मनवर पिंजारा हे झायलो (एम.एच.०२,सी.ई.४०१०) गाडीने शिरपूरकडे निघाले. कसारा बायपासजवळ एका हॉटेलमध्ये चहापान करून ते ११.४५ वाजता नाशिकच्या दिशेने रवाना झाले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हे वाहन वाडीवऱ्हे गाव ओलांडून शेवाळी विहीर परिसरातून जात असताना अंबर दिवा लावलेल्या एका वाहनाने पाठलाग सुरू केला. पोलिसांचे वाहन असेल असे समजून सुरक्षा कंपनीच्या वाहनचालकाने रस्ता मोकळा करून दिला. नेमकी तीच संधी साधली गेली आणि सोने लुटले गेले.