५८ लढल्या, ६ जणी जिंकल्या! राज्यातील महिला खासदारांची कामगिरी लक्षणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:31 AM2019-03-19T06:31:06+5:302019-03-19T06:31:24+5:30
पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने महाराष्टÑाला मिळाला; मात्र आजवरच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देताना मात्र सर्वच पक्षांनी हात आखडता घेतल्याचे दिसते.
- नंदकिशोर पाटील
मुंबई : पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने महाराष्टÑाला मिळाला; मात्र आजवरच्या लोकसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देताना मात्र सर्वच पक्षांनी हात आखडता घेतल्याचे दिसते. २०१४मध्ये महाराष्टÑातून ५८ महिला निवडणूक रिंगणात होत्या. पैकी पाच जणी जिंकल्या, तर प्रीतम मुंडे या पोटनिवडणुकीत निवडून आल्या.
संसदीय राजकारणात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात तोंडपाटीलकी करत असले तरी लोकसभेत सादर झालेले ‘महिला आरक्षण बिल’ राजकीय मताऐक्याअभावी गेली दहा वर्षे धूळ खात पडून आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा नारा मोठ्या उच्चरवात ऐकविला जातो, मात्र उमेदवारी देताना सोईस्करपणे महिलांचा विसर पडतो. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी, आमचे सरकार आले तर सर्वच क्षेत्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. तर ओडिसात बिजू जनता दलाने उमेदवारी देताना ३३ टक्के जागा महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ४२ टक्के जागा महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासारख्या मागासभागातून संसदेवर निवडून गेलेल्या केशरकाकू क्षीरसागर, सूर्यकांता पाटील आणि रजनीताई पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदीय कामकाजात मोलाचा सहभाग नोंदविला आहे. सातारच्या प्रेमलाताई चव्हाण उर्फ प्रेमलाकाकी यांनी शेतकरी महिलांविषयी केलेली भाषणं आजही वाचनीय आहेत. विदर्भाने नेहमीच महिला खासदारांचा सन्मान केला आहे. अनुसयाबाई काळे (नागपूर), राणी चित्रलेखा भोसले (रामटेक), प्रभा राव, उषाताई चौधरी आणि प्रतिभाताई पाटील यांनी विदर्भातील अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत.
राजकीय वारसदार
पूनम महाजन या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. उत्तर-मध्य मुंबईतून त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन खासदार प्रिया दत्त यांचा पराभव केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या त्या राष्टÑीय अध्यक्षा आहेत.
सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत.
हिना गावित या माजीमंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. गावित हे राष्टÑवादी काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. सर्वाधिक ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे काँग्रेसचे माणिकराव गावित यांचा पराभव केल्याने हिना गावित यांचे नाव चांगलेच चर्चेत आले.
भावना गवळी या माजी खासदार स्व.पुंडलिकराव यांच्या कन्या आहेत. त्या आजवर चार वेळा निवडून आल्या आहेत.
रक्षा खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.
प्रीतम मुंडे गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या
पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे बीडमधून निवडून आल्या.
2014
लोकसभा निवडणुकीत महाराष्टÑातील ४८ मतदारसंघातून ५८ महिलांनी निवडणूक लढविली. सामाजिक चळवळीतील मेधा पाटकर, अंजली दमानिया आणि मीरा संन्याल या लढाऊ महिलांनी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उडी घेतली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला.
यांनी गाजविली संसद
महाराष्टÑातील महिलांच्या संसदीय कामगिरीवर नजर टाकली, तर अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, प्रेमलाबाई चव्हाण, प्रमिला दंडवते, प्रतिभाताई पाटील आदी रणरागिणींनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी संसद दणाणून सोडल्याचा इतिहास आहे. सामाजिक आंदोलनातही त्यांचा लक्षवेधी सक्रिय सहभाग राहिलेला आहे. ‘लाटणेवाली बाई’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या मृणालताई गोरे यांनी गोरगरीब, कष्टकरी वर्ग आणि महिलांच्या प्रश्नांवर काढलेले मोर्चे आणि केलेली आंदोलनं आठवून पाहा. असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते या चळवळीतील महिला खासदारांनी केले आहे. आणीबाणीविरुद्ध आंदोलनातही या रणरागिणी आघाडीवर होत्या.
आजवरच्या खासदार
जयश्री रायजी (अपक्ष, मुंबई
१९५२) अनसुयाबाई काळे (नागपूर), राणी चित्रलेखा भोसले (रामटेक), उषाताई चौधरी (अमरावती), विजयमाला राजे (कोल्हापूर), प्रमिला दंडवते (दक्षिण मध्य मुंबई), मृणाल गोरे (उत्तर मुंबई), जयवंतीबेन मेहता (दक्षिण मुंबई), अहिल्या रांगणेकर (उत्तर मध्य मुंबई), प्रेमलाताई चव्हाण (सातार), केशरकाकू क्षीरसागर (बीड), प्रभा राव (वर्धा), प्रतिभाताई पाटील (अमरावती), शालिनीताई पाटील (पोटनिवडणूक, सांगली), सूर्यकांता पाटील (हिंगोली), रजनी पाटील (बीड), कल्पना नरहिरे (उस्मानाबाद), रूपाताई पाटील (लातूर), निवेदिता माने (हातकणंगले), प्रिया दत्त (उत्तर मध्य मुंबई), विमलताई देशमुख (अमरावती), शारदा मुखर्जी (रत्नागिरी), महाराणी विजयमाला राजाराम छत्रपती भोसले (हातकणंगले), इंदिरा मायदेव (पुणे दक्षिण)