ठाणे जिल्ह्यात एसटी चालक - वाहकांचा संप सुरूच ५८७ बसफेऱ्या रद्द; ६० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 08:12 PM2018-06-09T20:12:07+5:302018-06-09T20:12:07+5:30
जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान
ठाणे : एसटी कर्मचाऱ्यानी अचानक पुकारलेला संप शनिवारच्या दुसऱ्या दिवशी सुरूच आहे.जिल्ह्याभरातील आठ बस आगारातील एक हजार १४४ बस फेऱ्यापैकी सायंकाळी चार वाजेपर्यंत ५८७ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर केवळ ५५७ बसफेऱ्या ठिकठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. ऐनवेळी या बसेस रद्द केल्यामुळे सुमारे ४० टक्के किलो मीटर कमी झाले आहेत. यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाचे ६० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज विभाग ठाणे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यातील सामान्य जनतेसह विद्यार्थी, वयोवृध्दांसह रूग्णांचे प्रचंड हाल झाले. या संपाची मोठी झळ जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गमभागाला बसली आहे. जिल्ह्यातील आठ बस आगारातील ५० टक्के बसेस आजच्या दुसऱ्या दिवशी देखील बंद होत्या. पहिल्या दिवशी सुमारे ४८ टक्के वाहक व चालकांनी सक्रीय सहभाग घेतल्याने संध्याकाळपर्यंत ५५० फेऱ्या रद्द केल्या होत्या. या दरम्यान आठ वाहक, चालक व अन्यकर्मचाऱ्याना निलंबित केले मात्र आज तशी कोठेही कारवाई झाली नाही. याशिवाय दरम्यान कोठेही खाजगी बसेस, कंपन्या व शाळांच्या बसेसव्दारे प्रवाशी वाहतूक सुरू नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सकाळी ७० टक्के व सायंकाळी ६० टक्के बसेस सुरू असल्याचा दावाही त्यांनी लोकमतकडे केला.
जिल्ह्याभरातील आठ बस आगारांपैकी ठाणे १ व ठाणे २ या आगारातील प्रत्येकी ११८ बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. याशिवाय भिवंडी आगारात सर्वाधिक १६४ बस फेऱ्या रद्द केल्यामुळे केवळ ५२ फेऱ्या दुपारनंतर पूर्ण झाल्या. या खालोखाल शहापूरला ६३ फेऱ्या , कल्याणला केवळ २२ फेरी, विठ्ठलवाडीला ८०, मुरबाडला ११ फेऱ्या आणि वाडा येथे देखील आज ११ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. कालच्या तुलनेत कल्याण मुरबाड व वाडा येथे आज बसफेऱ्या रद्द करव्या लागल्याचे निदर्शनात आले.