आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 07:21 AM2024-05-14T07:21:52+5:302024-05-14T07:23:20+5:30

बीडमध्ये सर्वाधिक तर पुणे मतदारसंघात सर्वात कमी मतदान.

59 64 percent polling in the maharashtra state in the fourth phase for lok sabha election 2024 | आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

आधी ऊन आणि नंतर पावसामुळे घसरला मतदानाचा टक्का; चौथ्या टप्प्यात राज्यात ५९.६४ टक्के मतदान

मुंबई : लोकसभा  निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी राज्यात ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता शांततेत  मतदान झाले. रात्री साडे अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले आहे. यावेळीदेखील तुलनेने मतदानाचा टक्का वाढवण्यात यंत्रणांना अपयश आल्याचेच दिसून येते.  सर्वाधिक मतदान बीड मतदारसंघात ६९.७४ टक्के एवढे झाले तर सर्वांत कमी मतदान पुणे मतदारसंघात ५१.२५ टक्के झाले.

चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे, तसेच पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, सुजय विखे यांच्यासह २९८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.  औरंगाबादसह पुणे व मावळ मतदारसंघात झालेल्या वादळी पावसाचा फटका मतदानाला बसल्याचे दिसले. पुण्यात विशेष करून मतदानाची वेळ संपत आली की, मतदारांच्या रांगा लागत असतात. मात्र, साेमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली आणि मतदानासाठी उशिरापर्यंत लागणाऱ्या रांगा कमी झाल्याचे दिसले.  

सुजय विखे करू शकले नाहीत स्वत:ला मतदान

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे स्वत:ला मतदान करू शकले नाहीत. विखे पाटील परिवाराने त्यांचे मूळ गाव लोणी (ता. राहाता) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. लोणी हे गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे स्वत:ला मतदान ते करू शकले नाहीत. 

मतदान कर्मचाऱ्यांकडेच विखे पाटील यांची प्रचार पत्रके 

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराची पत्रके मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे आढळून आली. ग्रामस्थांनी त्याला आक्षेप घेतला. मतदान केंद्रावर यावेळी बराच गोंधळ झाला. मतदान केंद्रावरील अधिकारी हे विखे पाटील यांच्या शिक्षण संस्थेतील कर्मचारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यासंदर्भात त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिली. बाहेरच्या व्यक्तीने पत्रक टाकल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार लक्षात घेऊन केंद्रावरील कर्मचाऱ्यांची टीम तत्काळ बदलण्यात आली. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले.  

तृतीयपंथीयांचे १०० टक्के मतदान

अहमदनगर : इतर सर्वसामान्य महिला-पुरुषांसारखेच आम्हीही रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. यातून आमचे अस्तित्व अधोरेखित झाले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहोत याचे समाधान वाटले, अशा शब्दांत येथील तृतीयपंथीयांनी मतदान केल्यानंतर आपली भावना व्यक्त केली. नगर शहरात १२० तृतीयपंथी आहेत. त्या सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

भौगोलिक कोंडीमुळे भुमरे करू शकले नाहीत स्वतःला मतदान 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा  मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचे मतदान जालना लोकसभा मतदारसंघातील पाचोड येथील मतदान केंद्रावर असल्याने त्यांना स्वतःला मतदान करता आले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे तालुके जालना मतदारसंघात येतात. या भौगोलिक कोंडीमुळे भुमरे यांना स्वतःऐवजी जालना मतदारसंघासाठी मतदान करावे लागले.  

मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याचा मृत्यू 

जळगाव : मतदान केंद्रावर असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन संजय भगवान चौधरी (५३, रा.जोशी पेठ, जळगाव) या मनपा कर्मचाऱ्याचा रात्री दीड वाजता मृत्यू झाला. चाळीसगाव शहरातील तेहजीब उर्दू प्रायमरी स्कूल केंद्र क्रमांक १९१ या ठिकाणी त्यांना ड्युटी देण्यात आली होती.

वार्तांकन करताना पत्रकाराचा मृत्यू

अंबाजोगाई : निवडणुकीचे वार्तांकन करताना टीव्ही पत्रकाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८ वाजता ही घटना घडली. ठाणे येथील वैभव कनघुटकर (४५) वार्तांकन करण्यासाठी शहरात आले होते.  

मतदान कार्ड आहे, पण यादीत मात्र नाव नाही 

जालना : जालना मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास २० केंद्रांवरील मशीन बदलण्यात आली; तर मतदान कार्ड आहे, परंतु मतदार यादीत नाव नसल्याने जालना शहरातील शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. 

औरंगाबाद मतदारसंघात शांततेत मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. दुपारनंतर मतदानाचा टक्का घसरला. सकाळच्या सत्रात काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी होत्या. 

साठवण तलावासाठी मतदानावर बहिष्कार

बीड : उन्हाचा पारा असूनही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह होता. मतदानाची वेळ संपून गेल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. काही ठिकाणचे किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांतता होती. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी बहिष्कार टाकला होता.  

काँग्रेस शहराध्यक्षांच्या नावावर बोगस मतदान

पुणे : पुणे मतदारसंघातील सेंट मीराज स्कूलमधील मतदान केंद्रावर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिंदे यांनी मतदान अधिकारी यांच्याकडे तक्रार करून चॅलेंज व्होट, फॉर्म भरला, ११७ बी  नुसार मतदान केले. शिंदे म्हणाले की, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो होतो. त्यावेळी पोलिंग बूथच्या रजिस्टरमध्ये माझ्या नावावर कोणीतरी मतदान केल्याचे आढळले. यासंदर्भात मी संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर चॅलेंज व्होट, टेंडर व्होट फॉर्म भरून मतदान केले आहे.

जिवंत मतदार झाले मृत 

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भवानी पेठेतील मतदान केंद्र क्रमांक १८८ मध्ये जिवंत मतदारांची नोंद मृत असा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मतदान केंद्रातील मतदार असलेल्या पाचजणांची नाेंद मृत अशी आढळली. यात नजीर करीम शेख, राजा मोहन गावंडे, हसन शेखलाल शेख, विजय तुकाराम कोंढरे, फकीर अहमद शेख या मतदारांचा
समावेश आहे.

दोन माजी सरपंचांसह चौघांना दाखविले मयत

जळगाव : वडली गावातील मतदार यादीत गोकुळ गजमल पाटील व सत्यभामा अशोक पाटील या माजी सरपंचांसह त्र्यंबक श्यामराव पाटील व जितेंद्र एकनाथ पाटील या चार जिवंत व्यक्तींना मयत दाखविण्यात आले. त्याशिवाय मयत झालेल्यांची नावे कायम होती. नावनोंदणी करूनही अनेक नवमतदारांची नावेच समाविष्ट झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

अकरा मतदारसंघांतील मतदान

नंदुरबार
२०१४    ६६.७७%
२०१९    ६८.६५%
२०२४    ६७.१२%

जळगाव
२०१४    ५८.००%
२०१९    ५६.५५%
२०२४    ५३.६५%

रावेर
२०१४    ६३.४८%
२०१९    ६१.७७%
२०२४    ६१.३६%

जालना 
२०१४    ६६.१५%
२०१९    ६४.७५%
२०२४    ६८.३०%

औरंगाबाद
२०१४    ६१.८५%
२०१९     ६३.५५%
२०२४    ६०.७३%

मावळ
२०१४    ६०.११%
२०१९    ५९.५९%
२०२४     ५२.९०%

पुणे 
२०१४    ५४.१४%
२०१९    ४९.८९%
२०२४    ५१.२५%

शिरूर
२०१४    ५९.७३%
२०१९    ५९.४४%
२०२४    ५१.४६%

अहमदनगर
२०१४    ६२.३३%
२०१९    ६४.७९%
२०२४    ६२.७६%

शिर्डी 
२०१४    ६३.८०%
२०१९    ६४.९३%
२०२४    ६१.१३%

बीड
२०१४    ६८.७५%
२०१९    ६६.१७%
२०२४    ६९.७४%
 

Web Title: 59 64 percent polling in the maharashtra state in the fourth phase for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.