बस आणि टँकरच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

By admin | Published: July 2, 2017 08:45 PM2017-07-02T20:45:15+5:302017-07-02T22:49:29+5:30

पुणे- अहमदनगर हमरस्त्यावर हवेली तालुक्यातील लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली

6 people die in bus and tanker accident | बस आणि टँकरच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

बस आणि टँकरच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - मिनी बस आणि पाण्याच्या टँकरमध्ये झालेल्या भिषण अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल नऊ तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे नगर रस्त्यावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. या विचित्र अपघातात पाठीमागून येत असलेल्या आणखी दोन मोटारी दुस-या वाहनांनाही धडकल्या. त्यामधील प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व तरुण हिंजवडी येथील कंपनीमध्ये कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वैभव माने (वय 27, रा. म्हाळुंगे, बाणेर), महेश वसंत पवार (वय 28, रा. सासवड, ता. पुरंदर), नुपुर साहू (वय 26, रा. वनाज कॉर्नर, कोथरुड), निखील जाधव (वय 26, रा. भोसरी), अक्षय धबाडे (वय 28, रा, सांगवी), विशाल चव्हाण (वय 29, विमाननगर) अशी मृतांची नावे आहेत. तर सुमित प्रमोद मोरे (वय 28, रा. म्हाळुंगे), गणेश विलास शिंदे (वय 2, रा. म्हाळुंगे, बाणेर), अयुष गेहलोत (वय 26, रा. वनाज कॉर्नर, कोथरुड), विलास बिराजदार (वय 27, रा, बालेवाडी), सुरेश सिद्राम गायकवाड (वय 40, रा. बाणेर), रणजीर बाळासाहेब निकम (वय 29, रा, बाणेर), शरद शांताराम शेंडगे (वय 29, रा. बाणेर) अशी जखमींची नावे आहेत. 
हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमी पुणे नगर रस्त्याने एका मिनीबसमधून पुण्याच्या दिशेने येत होते. हे सर्वजण लग्नासाठी शनी शिंगणापूरजवळील सोनई येथे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणीकंद गावाजवळील रस्त्यावरुन पाण्याचा टँकर नगरच्या दिशेने जात होता. या टँकरने अचानक दुभाजकावरुन रस्त्याच्या दुस-या बाजुला वळण घेतले. त्याच वेळी पुण्याच्या दिशेने मिनीबस जात होती. या मिनीबसची विरुद्ध दिशेने येत असलेल्या पाण्याच्या टँकरला धडक बसली. बसचालकाने धडक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकरच्या चालकाच्या बाजुला ही बस धडकली. ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात उलटली. बसच्या काचा आणि दरवाजा निखळून बाजुला उडून पडले. दरम्यान, पाठीमागून येत असलेली एक मोटारही अपघातग्रस्त झाली. तर दुसरी मोटार एका कंटेनरवर जाऊन आदळली. 
बसमधील सर्व जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने जवळच्या दोन खासगी रुग्णालयांमध्ये हलवले. यातील सहा जणांना उपचारांपुर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर उर्वरीत नऊ जखमींवर उपचार सुरु आहेत. जखमींमधील बिराजदार किरकोळ जखमी असल्याने त्याला उपचार करुन सोडण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. 
लोणीकंद येथे झालेल्या या अपघातामुळे पुण्यातील कोथरुड, बाणेर, बालेवाडी आणि विमाननगर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सर्व तरुण असल्यामुळे अधिकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्वजण हिंजवडीमधील एका कंपनीमध्ये एकत्र काम करीत असल्याचे गरुड यांनी सांगितले. अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु असून प्राथमिकदृष्ट्या टँकरचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 6 people die in bus and tanker accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.