डोंबिवलीत चाळीवर झाड कोसळून ६ जण जखमी
By admin | Published: August 6, 2016 03:10 AM2016-08-06T03:10:25+5:302016-08-06T03:10:25+5:30
सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले.
डोंबिवली : सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले. त्यात सहा जण जखमी झाले. त्यातील गुडिया मेहता या महिलेला छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यात नांदिवली येथील कृष्णा पाटील यांच्या चाळीवर दुपारी ४ वाजता १०० वर्षांचे जुने वडाचे झाड कोसळले. त्यात रहिवासी गुडिया मेहता, शरद वर्मा, रीना मेहता, अंजली मेहता, रखमा पाटील व विनिता म्हात्रे हे जखमी झाले. ही घटना समजताच स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे व प्रकाश म्हात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दल व मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मात्र, केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र विभागाच्या आपत्कालीन कक्षाशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेथून कोणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
गुडिया, शरद व रीना यांच्यावर रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. अंजली, रखमा व विनिता यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या झाडामुळे चाळीतील चार खोल्यांचे नुकसान झाले. तसेच ‘महावितरण’चे सहा खांबही पडल्याने वीजपुरवठा बंद झाला. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुसळधार पावसामुळे शेजारील झाड अचानक कोसळले. त्यामुळे काही वेळ पुलावर वाहतूककोंडी झाली.
>मुंब्रा येथे दोन घरांच्या भिंती कोसळल्या
मुंब्रा : रेल्वे स्थानकाजवळील शाहूनगर वसाहतीतमधील दोन घरांच्या मागच्या बाजूच्या भिंती नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे शुक्रवारी कोसळल्या. यामुळे या परिसरात खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तेथील १३ घरांतील कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था बाजारपेठेतील पालिका शाळा क्र मांक ७५ मध्ये केली आहे.
>मुसळधार पावसामुळे रेल्वे विस्कळीत
ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. रेल्वेमार्गात पाणी तुंबल्यामुळे काही काळ लोकलसेवा बंद करावी लागली होती. मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या परिसरातील सुमारे २० गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या.
आतापर्यंत सर्वाधिक ठाणे शहर परिसरात २३१५ मिमी पाऊस झाला असून कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांत पाऊस झाला आहे.