राज्यात ६ टक्के बालकांचा अतिसाराने मृत्यू
By admin | Published: July 29, 2016 01:48 AM2016-07-29T01:48:39+5:302016-07-29T01:48:39+5:30
अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पुणे : अतिसार हे बालमृत्यूचे महत्त्वाचे कारण असून, त्याचे प्रमाण राज्यात ६ टक्के असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना होणाऱ्या जुलाबामुळे बालकांच्या शरीरातील पाण्याचे, तसेच क्षारांचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण कमी होऊन प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो.
यावर जलसंजीवनी हा अतिशय उत्तम उपाय असून, त्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन २९ जुलै या जागतिक जलसंजीवनी दिनाच्या निमित्ताने जगभरातून होताना दिसत आहे. अतिसार दीर्घकाळ राहिल्यास मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि अशक्तपणा येतो, तसेच वजन कमी होऊन कुपोषणाची समस्याही ओढवू शकते.
जलसंजीवनीमध्ये ग्लुकोज, सोडिअम, पोटॅशियम व सायट्रेट हे महत्त्वाचे घटक असतात. जुलाबांमुळे शरीरातील हे क्षार बाहेर फेकले गेल्याने अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा आणि शुष्कता भरून काढण्यासाठी जलसंजीवनी अतिशय उपयुक्त ठरते.
बालकाला देण्यात येणाऱ्या जलसंजीवनीतील घटकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या प्रमाणात असणे आवश्यक असते.
१ लीटर पाण्यात एक पाकीट टाकावे व दर पाच मिनिटाला एक चमचा अशा प्रमाणात ही जलसंजीवनी देण्यात यावी. हे प्रमाण कमी-जास्त झाल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही, असे बालरोग संघटनेकडून सांगण्यात आले.
ही संजीवनी देण्याचे योग्य ते प्रशिक्षण डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.
डॉक्टरांनीही अतिसार झालेल्या बालकाला औषधे देताना सर्वप्रथम जलसंजीवनी देणे आवश्यक आहे. ही जलसंजीवनी औषधांच्या दुकानांबरोबरच किराणा दुकान किंवा जनरल स्टोअरमध्येही उपलब्ध व्हावी, यासाठी बालरोगतज्ज्ञ संघटना प्रयत्नशील असल्याचे डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले. जलसंजीवनी हा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय असून, बाळाला ते जरूर देण्यात यावे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
- बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात आला. यामध्ये अतिसार असलेल्या, तसेच नसलेल्या बालकांनाही जलसंजीवनी देण्यात आली. अतिसाराच्या बालकांची संख्या कमी करणे आणि यामुळे एकाही बालकाचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.