शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
By admin | Published: February 5, 2016 06:13 PM2016-02-05T18:13:17+5:302016-02-05T18:29:21+5:30
राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरुन ११९ टक्के एवढा झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ : राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरुन ११९ टक्के एवढा झाला आहे.
याबाबतचा शासन निर्णय आज दि. ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. १ जुलै २०१५ पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय भत्त्याचा दर ११३ टक्के वरून ११९ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारी, २०१६ पासून या महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे. १जुलै, २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीच्या देण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश घोषित करण्यात येणार आहे.
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. सदर आदेश सुधारित वेतनसंरचनेत वेतन देय असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.
हा निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201602051308291805 असा आहे.