६ हजार रिक्षांची तपासणी
By admin | Published: June 12, 2017 03:04 AM2017-06-12T03:04:21+5:302017-06-12T03:04:21+5:30
धावत्या रिक्षामध्ये कापुरबावडी उड्डाणपुलावर २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर पीडित तरुणीच्या माहितीनुसार, पोलिसांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘३’
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धावत्या रिक्षामध्ये कापुरबावडी उड्डाणपुलावर २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर पीडित तरुणीच्या माहितीनुसार, पोलिसांनी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे ‘३’ अंकापासून सुरू होणाऱ्या रिक्षांच्या नंबरची यादी मागितली होती. ती आता ठाणे शहर पोलिसांना मिळाली असून, या
यादीत तब्बल ६ हजार रिक्षांचे नंबर मिळाले आहेत. त्यामुळे आता पोलिसांसमोर त्यातील नेमकी
रिक्षा, तसेच रिक्षाचालक व मालक कोण यांना शोधण्याचे आव्हान
आहे.
गेल्या चार दिवसांपासून ठाणे शहर परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी हे नौपाडा पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील प्रत्येक स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत तपास सुरू आहे. रिक्षाचा नंबर हा ‘३’ क्रमांकाने सुरू होतो, असे पीडित तरुणीने सांगितले. त्यानुसार ठाणे पोलिसांनी आरटीओकडे ३ अंकापासून सुरू होणाऱ्या रिक्षांची यादी
मागवली.
आरटीओने तयार केलेल्या
यादीत ६ हजार रिक्षांचे नंबर
असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. त्या यादीद्वारे पोलिसांनी चौकशी
सुरू केली असून, काही
रिक्षाचालकांना पोलीस ठाण्यात बोलावले जात आहे. तर काही रिक्षाचालकांच्या घरी पोलीस जाऊन माहिती घेण्याचे काम ठाणे पोलिसांनी सुरू केले आहे.
१० ते १२ पथके कार्यरत
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ-१मधील स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत प्रत्येकी एक विशेष पथक तयार केले आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेचीही मदत घेतली आहे. त्यानुसार १० ते १२ पथक शोधकार्य करत आहेत. तरीही पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही.