जन्मदात्रीने केली सहा वर्षीय मुलीची हत्या
By admin | Published: August 22, 2016 08:04 PM2016-08-22T20:04:28+5:302016-08-22T20:04:28+5:30
आपल्या सहा वर्षीय मतिमंद मुलीची नायलॉन दोरीने गळा आवळून जन्मदात्रीनेच हत्या केली. त्यानंतर आपणही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ऑनलाइन लोकमत
ब्रह्मपुरी (चंद्रपूर), दि. २२ : आपल्या सहा वर्षीय मतिमंद मुलीची नायलॉन दोरीने गळा आवळून जन्मदात्रीनेच हत्या केली. त्यानंतर आपणही गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र घरमालकाच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न फसला. ही घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास येथील वाल्मिक नगरात घडली. खुशी सिध्दार्थ रामटेके असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेत मृताची आई नलू रामटेके (३७) ही गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारार्थ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
वाल्मिक नगरात शिलावंत मेश्राम यांच्या घरी सिद्धार्थ रामटेके हे किरायाने राहतात. सिद्धार्थ रामटेके हे नेहमीप्रमाणे किन्ही येथील शाळेत गेले असता घरी आई नलू व मुलगी खुशी घरी होते तर मोठी मुलगी शाळेत गेली होती. खुशी ही मतीमंद होती. त्यामुळे आई नलू ही नेहमी चिंताग्रस्त असायची. सततच्या चिंतेमुळे नलूचेही मानसिक संतुलन ढासळत चालले होते. याच अस्वस्थेतून आज दुपारी नलूने आपली सहा वर्षीय मुलगी खुशीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:लाही संपविण्यासाठी नलून गळफास घेतला.
परंतु याच वेळी मोठी मुलगी शाळेतून घरी आली. तिने दार ठोठावले. मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरमालकाला सांगितले. त्यांनी खिडकीतून पाहिले असता खुशी मृतावस्थेत तर आई नलू तडफडत असल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी घटनास्थळ गाठून नलूला बाहेर काढले. गंभीर असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई नलूवर गुन्हा दाखल करण्यात आला.