परदेशातून झाकीर नाईकच्या बँक खात्यात 60 कोटींची रक्कम जमा
By admin | Published: August 11, 2016 07:52 AM2016-08-11T07:52:16+5:302016-08-11T07:52:16+5:30
वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकच्या बँक खात्यात गेल्या तीन वर्षात तब्बल 60 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 11 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकच्या बँक खात्यात गेल्या तीन वर्षात तब्बल 60 कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. ही रक्कम वेगवेगळ्या देशांमधून जमा करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात ही गोष्ट उघड झाली आहे. झाकीर नाईकच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या पाच खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली आहे.
मुंबई पोलिसांनी झाकीर नाईकची भाषणे, त्यांचे समर्थक, विरोधक तसेच सोशल मीडियावरील हालचालीवरून अधिक तपास सुरू केला होता. यामध्ये झाकीर नाईकच्या संस्थेला मिळणा-या देणगीच्या दृष्टीने पोलिसांनी आर्थिक बाजू तपासण्यास सुरुवात केली होती. यामध्ये हा 60 कोटींचा व्यवहार झाल्याचं लक्षात आलं आहे. 'हे पैसे नेमके कशासाठी होते याची अजून माहिती मिळू शकलेली नाही. आम्ही तपास केला असता हा व्यवहार समोर आला आहे. कुटुंब सदस्यांच्या नावे सर्व व्यवहार करण्यात आला आहे', असं पोलिसांनी सांगितलं आहे.
यामध्ये झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या नावे खातं नसून स्वत:च्या नावे असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झाकीर आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या व्यवहारांचीही पोलीस माहिती घेत आहेत. अद्याप पोलिसांनी इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या कर्मचारी, अधिका-यांची चौकशी करण्यास सुरुवात केलेली नाही.
'आम्ही त्यांच्याकडे पैशांचा स्त्रोत, तसंच नाईक आणि ठेवीदारांमधील संबंधासंबंधी चौकशी करण्याची शक्यता आहे'. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
9 ऑगस्ट रोजी झाकीर नाईकसंबंधीचा अहवाल मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. अहवालाच्या आधारावर झाकीर नाईकवर धार्मिक शत्रुत्व वाढवण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिले आहे.
अहवालात झाकीर नाईकवर धार्मिक तणाव भडकावण्यासोबतच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. झाकीर नाईककडून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच झाकीर नाईकचे अर्शीद कुरेशी आणि इसीस कनेक्शन असल्याचंही अहवालात पोलिसांनी नमूद केलं आहे. केरळमधील तरुणांना इसीस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अर्शीद कुरेशी याला अटक करण्यात आली होती.
झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली आहे. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली आहे.
झाकीर नाईकवर कायदेशी कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना तपास करण्यास सांगितलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) 2005 पासून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली. हे सर्व दहशतवादी सिमी, लश्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते. यात 3 पोलिसांचाही समावेश आहे.