शिवणी हायस्कूलला ६० लाखांची देणगी
By Admin | Published: December 14, 2014 10:36 PM2014-12-14T22:36:16+5:302014-12-14T23:58:21+5:30
वयोवृद्ध अधाटेंचे दातृत्व : कर्मवीरांचा वसा जपण्याचे ध्येय
कडेगाव : शिवणी (ता. कडेगाव) येथील ८८ वर्षांच्या शंकरराव मारुती अधाटे यांनी येथील म्हाळसाक्रांत विद्यालयाच्या इमारतीसाठी ६० लाख रुपयांची देणगी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा जपण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत.
शंकरराव अधाटे यांनी दिलेल्या देणगीतून शाळेच्या १० वर्गखोल्यांचे काम पूर्ण होणार आहे. या कामाचा पायाभरणी समारंभही शंकरराव अधाटे यांच्याहस्ते झाला. यापूर्वीही अधाटे यांनी या शाळेच्या सभागृह इमारतीसाठी १० लाख रुपयांची देणगी दिली आहे.
शंकरराव अधाटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात राहून, कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेतले. शालेय शिक्षण शिवणी येथे, तर उच्च शिक्षण सातारा येथील ‘रयत’च्या वसतिगृहात राहून घेतले. एम. एससी.पर्यंत शिक्षण घेऊन अधाटे अमेरिकेत नोकरीसाठी गेले. यावेळी अधाटेंना शिवणी येथील ग्रामस्थांनी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकवर्गणी काढून अमेरिकेत जाण्यासाठी आर्थिक मदत केली.कर्मवीरांचे, गावकऱ्यांचे व रयतप्रेमी सहकाऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी अधाटे यांनी शाळेसाठी मोठी देणगी दिली. अधाटे यांनी केवळ शिवणीच नव्हे, तर ‘रयत’च्या अनेक शाळांना आर्थिक मदत केली आहे.
शिवणी हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. ए. पवार, माजी उपसभापती बाजीराव पवार, डॉ. बी. एन. पवार, यशवंत पवार, विनायक दबडे, महेश पवार आदी ग्रामस्थांशी संपर्क साधून अधाटे यांनी स्वच्छेने शाळेला भरघोस मदत केली. (वार्ताहर)...
समाजऋणाची परतफेड
स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. पैशासाठी सर्वत्र भटकलो समाजाने मदतीचा हात दिला. अमेरिकेत नोकरी करून परतलो. मुले अमेरिकेत उच्च पदावर नोकरी करीत आहेत. आता समाजाचे ऋण फेडणे बाकी आहे. यासाठी शाळेला सर्वतोपरी मदत करीत आहे, असेही अधाटे यांनी सांगितले.