पाणीपुरीतून ६0 जणांना विषबाधा
By admin | Published: February 20, 2016 02:19 AM2016-02-20T02:19:09+5:302016-02-20T02:19:09+5:30
पिंपळगाव सैलानी येथील घटना; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
पिंपळगाव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या माळवंडी येथे पाणीपुरी खाल्याने लहान मुलांसह जवळपास ६0 जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरूवारी रात्री १0.३0 वाजता घडली. काहींवर बुलडाण्यातील खासगी, तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
गुरूवारी रात्री ९ ते १0 वाजताच्या सुमारास माळवंडी येथील काही बालकांनी गावातीलच एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. काही वेळातच या बालकांना मळमळ होऊन उलट्या व शौचाचा त्रास सुरू झाला. सुरूवातीला घरच्या मंडळीनी दुर्लक्ष केले; मात्र त्रास वाढू लागल्याने आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने गावकर्यांमध्ये घबराट पसरली. पाहता- पाहता रूग्णांचा आकडा ४0- ५0 वर पोहोचला. काही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले, तर जवळपास ३0 ते ४0 जणांना रात्री उशीरा जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. रात्रभर उपचार केल्यानंतर २0 ते २५ जणांना डॉक्टरांनी शुक्रवारी सुटी दिली. काही रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अदय़ापही उपचार सुरू आहेत.