राज्यात ६० हजार, मुंबईत २५ हजार बोगस डॉक्टर
By admin | Published: July 7, 2015 03:54 AM2015-07-07T03:54:05+5:302015-07-07T04:10:52+5:30
तापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूजा दामले, मुंबई
तापेने फणफणलात किंवा आजाराने ग्रासले म्हणून डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरच बोगस निघावा... तुमच्या आजूबाजूला असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्यात तब्बल ६० हजार आणि मुंबईत २५ हजार डॉक्टर बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. टी.सी. राठोड यांनीच लोकमतला ही माहिती दिली.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनीही या आकडेवारीला दुजोरा दिला आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणांहून आम्हाला वेळोवेळी इनपुट्स मिळत असतात. त्याआधारे राज्यातील बोगस डॉक्टरांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. यातील बहुतेक डॉक्टर पश्चिम बंगालमधून दाखल होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कंपाउंडर म्हणून अनेक व्यक्ती दवाखान्यात अनेक वर्षे काम करत असतात. वर्षानुवर्षे तेच काम केल्याने डॉक्टर कोणत्या आजाराच्या वेळी कोणत्या गोळ्या देतात, याचा अंदाज त्यांना येतो. एवढ्या माहितीच्या आधारावर हे कंपाउंडर थेट डॉक्टरांच्या थाटात व्यवसाय सुरू करतात, अशी माहितीही वैद्यकीय परिषदेच्या सूत्रांनी दिली.
ग्रामीण भागात चालणारे बहुतेक दवाखाने हे अशाच व्यक्तींद्वारे चालवले जातात. लवकर बरे वाटावे तसेच कमी पैशांत औषधे उपलब्ध होत असल्याने या तथाकथित डॉक्टरांकडे मोठी गर्दी होते. प्रत्यक्षात या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा मान्यताप्राप्त वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेला नसतो. तसेच त्यांची कोणत्याही वैद्यकीय परिषदेत नोंदणीदेखील नसते.
ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही गल्ल्यागल्ल्यांमध्ये असे दवाखाने आता सुरू आहेत. बोगस डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसताना ते सरधोपटपणे औषधे देतात. यामुळे राज्यातील जनतेचा जीव धोक्यात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
जेवढे अधिकृत तेवढेच अनधिकृत !
> महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
च्ग्रामीण भागातील दवाखान्याच्या बोर्डवरूनदेखील या परिस्थितीचा अंदाज येतो. राज्यात जितके नोंदणीकृत डॉक्टर आहेत, तितकेच बोगस डॉक्टर असू शकतात.
> ‘सरकारने गांभीर्याने पाहावे’
एकट्या दिल्लीत ४० हजार बोगस डॉक्टर होते. ते प्रमाण पाहता मुंबईसह राज्यातील बोगस डॉक्टरचे प्रमाण हे किती तरी अधिक असण्याचीच शक्यता आहे. सरकारने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शोधप्रक्रिया राबवण्याची गरज आहे. - डॉ. शिवकुमार उत्तुरे, सदस्य, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
> जिवाला धोका
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, कोणतेही औषध देताना रुग्णाचा आजार, त्याचे कारण, वय अशा अनेक गोष्टींचा विचार करून डोस दिला जातो. फक्त आजार पाहून औषध दिल्यास रुग्णाच्या जिवाला धोका असतो.